Tue, Jun 18, 2019 22:35होमपेज › Satara › अतिक्रमणामुळे मरण झाले स्वस्त

अतिक्रमणामुळे मरण झाले स्वस्त

Published On: Jan 02 2018 1:15AM | Last Updated: Jan 01 2018 10:42PM

बुकमार्क करा
कोडोली : वार्ताहर 

देगाव फाट्यानजिक दोन दिवसांपूर्वी भीषण अपघातात आजी व नात ठार झाली. या अपघातास वाहन चालकांच्या निष्काळजीप्रमाणेच परिसरात झालेली अतिक्रमणे जबाबदार आहे. या अतिक्रमणांमुळेच यापूर्वीही अनेक अपघात झाले असून देगाव फाटा परिसरात अतिक्रमणामुळे मरण स्वस्त झाले असल्याचा अनुभव येत आहे. दरम्यान, अतिक्रमण विरोधात एमआयडीसी रस्ते विकास प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

देगाव फाटा ते नवीन औद्योगिक वसाहत या मार्गाच्या दोन्ही बाजूस व्यवसायिकांनी अतिक्रमणे केेल्यामुळे रस्त्यांची रूंदी कमी झाली आहे. या मार्गावरून वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावरच बाजारपेठ असल्याने नागरिक खरेदीसाठी येतात. रस्त्यावर बेशिस्त पार्किंग असल्याने वाहनधारक, पादचारी, दुचाकी वाहने, महिला, जेष्ठ नागरिक विद्यार्थी यांना जीव मुठीत घेवून जावे लागते. अतिक्रमणाबरोबरच रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधकामे चालू असून त्यांच्या साहित्याचे ढीग रस्त्यावरच असतात. काही बिल्डरनी वॉचमन व साहित्य ठेवण्यासाठी रस्त्याकडेलाच शेड ठोकली आहेत.

अपघात झालेल्या भंडारी रिजन्सीच्या समोर जेथे अपघात झाला. त्या ठिकाणी निरगुडीच्या झाडांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे देगाव फाटा ते अमरलक्ष्मी चौकापर्यंतचा संपूर्ण रस्ता अतिक्रमणात सापडल्याने वाहतुकीच्या दृष्टीने डेंजर झोन बनला आहे. 

या सर्व बाबीला एमआयडीसी रस्ते विकास प्राधिकरण जबाबदार असून या विभागाने आतापर्यंत अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावणे व खाबुगिरी करणे या पलिकडे काहीही केलेे नाही. त्यामुळे अपघाताला संबंधित विभागच जबाबदार असून या विभागाच्या अधिकार्‍यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये जाणार्‍या रस्त्यांची पाहणी करुन अतिक्रमणे काढण्यास संबंधित विभागास भाग पाडावे. अन्यथा रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.