Fri, Jul 19, 2019 17:43होमपेज › Satara › शेळकेवाडी येथे उरमोडी नदीत बुडून मुलाचा मृत्यू

शेळकेवाडी येथे उरमोडी नदीत बुडून मुलाचा मृत्यू

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 10:35PMवेणेगाव : वार्ताहर 

साताराहून मित्रांसमवेत शेळकेवाडी  (ता. सातारा) येथे पोहण्यासाठी आलेल्या जीवलग अशा तिघा मित्रांपैकी एकाचा उरमोडी नदीत पोहत असताना बुडून मृत्यू झाला. अविनाश बाबुराव यादव  (वय 15, रा.माची पेठ, सातारा) असे मृत मुलाचे नाव आहे. 

दरम्यान, अगोदरच अविनाशच्या आयुष्यातील वडिलांचे छत्र हरपले असताना या एकुलत्या मुलाच्या मृत्यूची बातमी अविनाशची आई लिना यादव यांना समजताच त्यांचा आक्रोश सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. 

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माचीपेठ सातारा येथील अविनाश यादव त्याचे मित्र अहमद सादीक शेख, सचिन रमेश कट्टीमने हे तिघेजण जीवलग मित्र होते. तेे सातार्‍यातील भवानी विद्यामंदिर येथे शिकत असून तिघा मित्रांनी आठवीची परीक्षा दिली आहे. शुक्रवारी सकाळी हे तिघेजण शेळकेवाडी येथे उरमोडी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी आले. या दरम्यान इतर अनेक मुले या नदीत पोहत होती. मात्र, अविनाशला व्यवस्थित पोहता येत नसल्याने तो कमी पाण्यात पोहत असतानाच अविनाश यादवचा बुडून मृत्यू झाला. 

अविनाशच्या अकाली मृत्यूने शेळकेवाडीसह परिसर शोकसागरात बुडून गेला. शुक्रवारचा काळा दिवस हा अविनाशच्या जीवनात अखेरचा ठरला. या घटनेची खबर शेळकेवाडीचे पोलीस पाटील संजय मानाजी संकपाळ यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार शशिकांत फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चेतन बगाडे करीत आहेत.