Sat, Jul 20, 2019 14:58होमपेज › Satara › संगणकीकृत सातबार्‍यामुळे सामान्यांना डोकेदुखी

संगणकीकृत सातबार्‍यामुळे सामान्यांना डोकेदुखी

Published On: Jun 16 2018 1:32AM | Last Updated: Jun 15 2018 10:14PMढेबेवाडी : विठ्ठल चव्हाण

संगणकीय सातबारा उतारा मिळवताना सर्व्हर डाऊन झाल्याची कारणे सर्वसामान्यांना सांगितली जातात. तब्बल 25 दिवसांपासून सर्व्हरची समस्या असल्याचे सांगत सर्वसामान्यांची अक्षरशः ससेहोलपट सुरू आहे. हस्तलिखित सातबारा मिळवताना ‘वजन’ ठेवावे लागत असून महसूल विभागातील झारीतील शुक्राचार्यांना संगणकीय सातबारा हे सर्वसामान्यांना लुटण्याचे एक कुरणच बनल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. पण लोकशाहीत सर्वसामान्यांना कोणीच वाली नसल्याचे अनेकदा पहावयास मिळते. त्यामुळेच अनेकदा सर्वसामान्यांची होणारी लूट, त्यांना होणारा त्रास उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक रहात नाही. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांच्या हितासाठीच असतात आणि हे वास्तवही नाकारून चालणार नाही. पण काही योजना सर्वसामान्यांसाठी कशा मारक ठरतात? आणि काहींना यातून आपले उखळ पांढरे करण्याचे नवे साधन मिळते? याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संगणकीकृत सातबारा .

कराड तालुक्यातील तहसील कार्यालयात फेरफटका मारल्यास एकही चांगला शब्द ऐकायला मिळत नाही. कराड तालुक्यातील सर्व गावांचे महसुली दप्तर गेल्या दोन वर्षांपासून संगणकीकृत करण्याचे काम सुरू झाले ते अजून सुरूच आहे. शेतकर्‍यांनी सातबारा किंवा अन्य दाखले वा कागद हवा असेल, तर तालुक्याला जायचे, पंधरा रूपये भरून संगणकीकृत सातबारा मिळवायचा, पण तो त्याच दिवशी मिळेल याची खात्री नसते.

अनेक तलाठी आँनलाईनचे कारण सांगून गावात येत नाहीत. तालुक्यावर गेले तर तिथेही भेटेलच याचीही खात्री नसते. सातबाराच्या काही दुरूस्तीचे, फेरफाराचे काम असेल, तर ते संगणकावर करणारा व्यक्ती असेल तरच होते. मात्र त्यासाठीही ‘वजन’ खर्ची करावे लागते, असे सर्वसामान्यांचा अनुभव आहे. सर्व्हर डाऊन असल्याने खरेदी दस्त करताना लोकांपुढे अडचणी येतात. त्यामुळे हस्तलिखित सातबारा तसेच अन्य कागदपत्रांसाठी आवश्यक दाखला मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा कितीचे ‘वजन’ ठेवावे लागेल? हे ऐकून सामान्यांच्या घशाला कोरडच पडते, असेही बोलले जात आहे.

पंधरा ते वीस  दिवसांत फेरफार होऊन उतारा मिळत असे. आता दोन वर्षातही मिळत नाही. संगणकीय काम करणार्‍या ठेकेदाराने केलेली चूक दुरूस्तीही चार महिन्यातही होत नाही. त्यामुळेच ही यंत्रणा सुधारा, किती फी द्यायची ते ठरवा? किती वेळेत काम करायचे हे ठरवा? किंवा संगणकीय दप्तर ही संकल्पना बंद करून पुन्हा हस्तलिखित सेवा सुरू करा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. 

पाच हजार खर्च, पण दुरूस्तीचे नावच नाही....

मी 2017 मध्ये 9 गुंठे जमीन खरेदी केली, त्याचा फेरफार होऊन मला फेरफार व सातबाराचा उतारा मिळाला. मात्र संगणकीकरण करताना कुणाची तरी चूक झाली. जानेवारी 2018 मध्ये नवीन उतारे काढताना माझे नावच सातबाराला नाही. म्हणून गेल्या जानेवारी महिन्यापासून त्यांच्याकडून झालेली चूक दुरूस्तीसाठी हेलपाटे मारीत आहे. आतापर्यंत पाच हजार रूपये खर्च झाला पण अजून सातबारा दुरूस्त झालेलाच नाही, असे पवारवाडी (बामणवाडी) येथील निवास पवार यांनी सांगितले.