Fri, Apr 19, 2019 08:17होमपेज › Satara › दूध भेसळीमुळे बालकांच्या आरोग्यावर परिणाम

दूध भेसळीमुळे बालकांच्या आरोग्यावर परिणाम

Published On: Nov 30 2017 11:55PM | Last Updated: Nov 30 2017 11:43PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सध्या अनेक ठिकाणी दुधात पाणी व पिशवीतील दुधाची मोठ्या प्रमाणात भेसळ करुन भेसळीच्या दूधाची अधिक दरात विक्री केली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अशा दुधामुळे बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचेही वास्तव आहे. 

पिशवीतील क्रीम काढलेले  दर्जाहीन दूध वापरण्याऐवजी गावातून विक्रीस आणलेल्या उत्तम दर्जाच्या  दुधास अधिक पैसे देवून शहरातील बहुतांश कुटुंबिय दुधाची खरेदी करत आहेत. ग्रामीण भागातून शहरात येवून दूध विक्री करणार्‍यांकडे यामुळे दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक गावातून व वाड्यावस्त्यामधून अनेक शेतकरी दररोज पहाटे सायकल, दुचाकी व चारचाकीमधून दूधाच्या किटल्या व कॅन घेवून शहरातील विविध ठिकाणी गायी व म्हैशीच्या दुधाची विक्री करत आहेत. काही विक्रेते प्रामाणिकपणे दूध विक्रीचा व्यवसाय करत असले तरी अनेकजण भेसळीचे दूध विकत असल्याने या व्यवसायाला बट्टा लागला आहे. पूर्वी मिळत असलेल्या दुधासारखी या भेसळीच्या दुधाला चव नसून सायही निघत नाही. दूध भेसळीयुक्त मिळत असल्याबाबतच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. अशा दूध भेसळीला वेळेवर पायबंद न घातल्यास चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिन्हे  आहेत. त्यामुळे याबाबींकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. 

भेसळखोरांवर कडक करवाईची गरज

दूध हे पूर्णअन्न असल्याने दूधाचा वापर सर्वात जास्त प्रमाणात होतो. लहान मुले, तरुण व वृद्धांसाठी दूध हे टॉनिकचे काम करते. मात्र दुधात भेसळ होत असल्याने फायदेशीर ठरण्याऐवजी दूध घातक ठरत आहे. तरी अन्न व औषध प्रशासनाने भेसळीचे दूध विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.