महाबळेश्वर : वार्ताहर
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कलाकारांना नाट्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठावरून आपला अभिनय सादर करण्याची संधी त्यांना द्यावी, असे मत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेचे उद्घाटन मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्यवाह दिपक करंजीकर, नियामक मंडळाचे सदस्य सुनिल महाजन, डी. एम. बावळेकर, संतोष शिंदे, रवींद्र कुंभारदरे, राजेश कुंभारदरे, पदाधिकारी उपस्थित होते.यानिमित्त काढण्यात आलेल्या नाट्यदिंडीमध्ये पारंपारिक वेशातील महिला, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेल्या पालखीत नटराज मूर्ती व विविध विषयांवरील नाटकांची पुस्तके ठेवली होती. याचे पूजन मोहन जोशी यांच्या हस्ते करून दिंडीची सुरूवात करण्यात आली. ही दिंडी छ. शिवाजी चौकातून बाजारपेठ मार्गे, सुभाष चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रे गार्डन बसस्थानकमार्गे सभागृहात पोहचली.
यावेळी झालेल्या मुलाखतीत जोशी यांनी आपल्या अभिनयाच्या वाटेतील अनेक टप्पे रसिकांसमोर मांडले. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, अजय देवगण, आशा काळे यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव कथन केले. रसिकांकडून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जोशी म्हणाले, नट म्हणून कलाकाराचा नाटकामध्ये काम करताना कस लागतो. इतर प्रकारात चुक सुधारण्याची संधी असते. परंतु नाटकात ती संधी तुम्हाला मिळत नाही.