Fri, Jun 05, 2020 12:46होमपेज › Satara › रणरणत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी वणवण

रणरणत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी वणवण

Published On: Apr 06 2019 1:51AM | Last Updated: Apr 06 2019 1:51AM
शिंगणापूर : सचिन बडवे

नेहमीच निसर्गाची अवकृपा असलेल्या  माण  तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा फास दिवसेंदिवस वाढतच असून बळीराजा मेटाकुटीला आला आहे. घोटभर पाण्यासाठी माणदेशी जनतेला रणरणत्या उन्हात पायपीट करावी लागत आहे.

सध्या तालुक्यातील 64 गावे, 498 वाड्यावस्त्यांना 85 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचा प्रश्‍न गंभीर बनला असून अन्नपाण्यासाठी पशुपक्ष्यांची तडफड सुरू असल्याचे चित्र आहे. यापुढील दोन महिने कसे काढायचे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

माण तालुक्यात गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे  ऑक्टोबर पासूनच तालुक्यातील जनतेला पाणीटंचाई समस्येला सामोरे जावे लागले आहे. तालुक्यातील 9 मंडलांतर्गत 105 महसूल गावे असून सध्या पांगरी, बिजवडी, बिदाल, तोंडले, वडगाव, येळेवाडी, जाधववाडी, मोगराळे, पाचवड, दहिवडी, महिमानगड, उकिर्डे, दिवडी, कोळेवाडी, स्वरूपखानवाडी,  राजवडी,  हस्तनपूर, अनभुलेवाडी, वावरहिरे, शिंगणापूर, पिंपरी, पळशी, पिंगळी बु, गोंदवले बु, जाशी, शिरताव, हिंगणी, धुळदेव, गंगोती, वाकी, वारुगड, शिरवली, काळचौंडी, कुळकजाई, परकंदी, टाकेवाडी, बोडके, आंधळी, पांढरवाडी, भालवडी, खडकी, भाटकी, रांजणी, वर.-म्हसवड, कारखेल, संभूखेड, इंजबाव, हवालदारवाडी, पर्यंती, मार्डी, बनगरवाडी, महाबळेश्‍वरवाडी, शेनवडी, विरळी, पानवण, जांभुळणी, कुरणेवाडी, वळई, वर.-मलवडी, चिलारेवाडी, पुळकोटी, कुकुडवाड, पुकळेवाडी, ढाकणी या 64 गावांसह 498 वाड्या-वस्त्यांना 4 शासकीय व 81 खासगी अशा एकूण 85 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

टँकर भरण्यासाठी प्रशासनाने 23 ठिकाणच्या पाणीस्रोताचे अधिग्रहण केले आहे. मात्र, पाण्याची पातळी खालावल्याने तसेच वाहतुकीचे अंतर जास्त असल्याने टँकरच्या नियोजित खेपा वेळेत होत नसल्याचे चित्र आहे.

सध्या 70 टक्के माण तालुका टँकरबाधित झाला असून तालुक्यातील 1 लाख 20 हजार नागरिकांना तसेच 39 हजार 238 जनावरांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दुष्काळाची तीव्रता वाढतच असून दिवसेंदिवस टँकर मागणीचे आणखी प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल होत आहेत. मात्र, तालुक्यातील आंधळी, पिंगळी, शिंगणापूर, राजेवाडी, महाबळेश्‍वरवाडी, राणंद यासारखे तलाव कोरडे पडले आहेत, तर विहिरी, बंधारे, कूपनलिकांची पाणीपातळी खालावली असल्याने प्रशासनापुढे टँकर कोठे भरायचे? असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

पशुधन वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड...

खरीप व रब्बी हंगाम वाया गेल्याने माणदेशात पाण्याबरोबरच जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍नही गंभीर बनला आहे. शेतकर्‍यांना आपली जनावरे कवडीमोल दराने कसायाच्या स्वाधीन करावी लागत आहेत.पशुधन वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू असून तालुक्यातील मेंढपाळांनी चार्‍यासाठी स्थलांतर केले आहे. मात्र, गाईगुरे, पशुपक्षी यासह रानटी प्राण्यांची अन्नपाण्यासाठी तडफड सुरू आहे. सध्या जनावरांपेक्षा चार्‍याची किंमत जास्त आहे. पशुधन वाचवण्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरु करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.