Fri, Jun 05, 2020 11:18होमपेज › Satara › जिल्ह्यात ७१३ तलाव कोरडे ठाक

जिल्ह्यात ७१३ तलाव कोरडे ठाक

Published On: May 09 2019 1:52AM | Last Updated: May 08 2019 11:43PM
सातारा : प्रवीण शिंगटे 

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्याने अनेक दुष्काळ पाहिले आहेत; पण यावर्षीच्या दुष्काळाने कहरच  केला आहे. 1972 च्या दुष्काळाची आठवण व्हावी, अशी परिस्थिती ओढवली आहे. माण-खटाव तालुक्यांत तर दुष्काळाने हाहाकार माजवला असून पाण्याच्या एकेका थेंबासाठी जनता तडफडत आहे. जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाच्या 747 तलावांपैकी तब्बल 713 तलाव कोरडे ठणठणीत पडल्याने येथे पाण्याचा टिपूसही पाहायला मिळत नाही. उर्वरित 34 तलावांत मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्‍न गंभीर बनला आहे. दुष्काळी पट्ट्यात तर अनेकांनी स्थलांतर सुरू केले आहे. या भयावह परिस्थितीने जनतेला जगणंच नकोसं झालं आहे. दुष्काळी चटक्यांनी होरपळून गेलेलं हे जिल्ह्यातील विदारक वास्तव आजपासून क्रमश:...

जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थितीने हाहाकार उडाला आहे. प्यायला पाणी नाही, खायला धान्य नाही, जनावरांना चारा नाही.कवडीमोल किमतीत पशुधन विकलं जात असून जगायचं कसं असा प्रश्‍न माण-खटाववासीयांना सतावत आहे. या दुष्काळी पट्ट्यासह अन्य तालुक्यांतही हे चटके बसत आहेत. पाण्यासाठी तर जनता कासावीस आहे.  वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होऊ लागल्यामुळे जिल्ह्यातील तलाव व धरणांतील पाणीसाठे कोरडे पडू लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाच्या 747 तलावांपैकी तब्बल 713 तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. 34 तलावात मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.  परिणामी दुष्काळी माण व खटाव तालुक्यातील जनतेला दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत.

अत्यल्प पावसामुळे यंदा जलसाठ्यांमध्ये  असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच माण, खटाव व कोरेगाव तालुक्यातील काही भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली. नागरिकांना पाण्यासाठी मैलो न मैल वणवण भटकावे लागत आहे. अनेक गावांमध्ये प्यायला पाणी नाही. दुष्काळी भागातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील बहुतांश पाझर तलाव कोरडे पडले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. शेती व पिण्यासाठी मोठा आधार ठरणारे पाझर तलाव कोरडे पडले.पाझर तलावाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेकडो एकर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत.

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे सातारा तालुक्यात 14, वाई 22, कोरेगाव 110, खंडाळा 50, फलटण 10, जावली 7, खटाव 166, माण 213, कराड 59, पाटण 16 असे मिळून 747 पाझर तलाव आहेत. त्यापैकी तब्बल 713 पाझर तलाव कोरडे ठाक पडले आहेत. तर फक्त 34 तलावात मृत पाणीसाठा उरला आहे. 

माण व खटाव तालुक्यातील अनेक असे छोटे-मोठे पाझर तलाव आहेत की गेल्या काही वर्षापासून पाणीच साठले नसल्यामुळे हे तलाव भेगाळले आहेत. तलावामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे उगवली असून तिही आता मरणासन्न झाली आहेत.  वर्षानुवर्षे या तलावात गाळ साठल्यामुळे पाणी साठा होत नाही. तलावांची खोली कमी झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. पावसाळा सुरू होण्यापुर्वी प्रशासनाने या तलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करणे गरजेचे आहे. 

मृत पाणीसाठा असलेले तलाव...

जिल्ह्यात लघू पाटबंधारेच्या 34 तलावांमध्ये मृत पाणीसाठा उरला असून तोही काही दिवसांत संपून जाणार आहे. मृतसाठा असलेले असे आहेत तलाव :   फलटण तालुक्यात सालपे (कुंडदरा), सालपे (रामेश्‍वर), बिबी व आदर्की खु., हणमंतवाडी या तलावांत प्रत्यक्ष 139.24 घ.मी. पाणीसाठा आहे. 

 खंडाळा तालुक्यात मिरजे, बेंगरूटवाडी, पवारवाडी, कवटे या तलावांत प्रत्यक्ष 129.10 घ.मी.पाणीसाठा आहे.   कोरेगाव तालुक्यात पवारवाडी क्रमांक 3, नागझरी क्रं.1, आर्वी क्र.1 व बेलेवाडी या तलावांत प्रत्यक्ष 163.67 घ.मी. पाणीसाठा आहे. 

सातारा तालुक्यातील सारखळ तलावात 49.56 घ.मी. पाणी आहे.   जावली तालुक्यातील मोरघर येथील तलावात 50.97 घ.मी. पाणीसाठा शिल्लक आहे.  

कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी, मुळीकवाडी, पाचुंद, मस्करवी येळगाव, वडगाव हवेली, येणपे लोहारवाडी, साळशिरंबे या तलावांत 487. 60 घ.मी. पाणीसाठा शिल्लक आहे.   पाटण तालुक्यातील धामणी, कळंबे, जत्रेवाडी, गलमेवाडी या तलावांत 360.75 घ.मी. पाणी साठा आहे.    माण तालुक्यातील गट्टेवाडी (घुलेमळा) येथील तलावात 50.94.  वाई तालुक्यातील धावडी येथील तलावात 26.95 घ.मी. पाणीसाठा आहे.   खटाव तालुक्यातील म्हासुर्णे (बामणकी), अंभेरी नं.1, नं.2, चोराडे, राजाचे कुर्ले (काळवट) व रणसिंगवाडी येथील तलावांत 204.79 घ.मी. पाणीसाठा  कसाबसा उरला आहे.