Sat, Jan 19, 2019 14:07होमपेज › Satara › मद्यपि पोलिसाची होमगार्डला मारहाण

मद्यपि पोलिसाची होमगार्डला मारहाण

Published On: Feb 27 2018 1:56AM | Last Updated: Feb 26 2018 10:56PMउंब्रज :प्रतिनिधी

उंब्रज ता. कराड येथील पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याने रात्र गस्तीच्या बंदोबस्तात असलेल्या होमगार्डला दारूच्या नशेत शिवीगाळ व  मारहाण केली.  सदरची घटना रविवार दि.25 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वा.च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी फिर्याद घेण्यास पोलिस टाळाटाळ करीत आहेत.  दरम्यान सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मद्यपि पोलिस कर्मचार्‍यावर तात्काळ  कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज येथील युवक सुरज खडके हा गेले पाच वर्षांपासून होमगार्ड म्हणून काम करीत आहे. रविवारी रात्री ते अन्य होमगार्डासमवेत बाजारपेठेतील चौकात रात्रगस्तीसाठी हजर होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास उंब्रज पोलिस ठाण्याचे कर्मचारी आण्णाराव बाबुराव मारेकर हे मद्यधुंद अवस्थेत तेथे गेले व खडके यांच्यावर शिव्यांचा भडीमार सुरू केला. 

शिवाय त्यांच्या अंगावर धावून जावून काठीने मारहाण केली. यामध्ये खडके यांच्या हाताला दुखापत झाली आहे. येथे उपस्थित हवालदार भुजबळ व भादुले यांनी मारेकर यांना समजवण्याचा प्रयत्न केला. 
दरम्यान खडके यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले. 

सोमवारी सकाळी खडके व अन्य होमगार्ड उंब्रज पोलिस ठाण्यात हवालदार मारेकर याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आले  मात्र तक्रार घेण्यात टाळाटाळ करण्यात आली. रविवारी रात्री शिवाजी चौकात घडलेला हा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असून मारेकर यांच्या कृत्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे. दोन महिन्यापूर्वी पाल येथे हवालदार मारेकर यांनी शहापूर येथील एकास दारूच्या नशेत दुचाकी लावण्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण केली होती.