Sun, Aug 18, 2019 20:35होमपेज › Satara › ड्रेनेजचे काम अपूर्ण अन् रस्त्यांच्या कामाची घाई

ड्रेनेजचे काम अपूर्ण अन् रस्त्यांच्या कामाची घाई

Published On: May 30 2018 2:23AM | Last Updated: May 29 2018 11:45PMकराड : अमोल चव्हाण

मलकापूरच्या निवडणुकीसाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. आपल्या वार्डमध्ये आरक्षण पडल्याने अनेकजण शेजारच्या वार्डमध्ये उडी मारण्याची तयार करू लागले आहेत. या वॉर्डमध्ये ड्रेनेजची पाईपलाईन टाकताना ठेकेदाराने जमिनीचा उतार न बघताच एकाच रस्त्यावर दोन वेळा खुदाई करून पाईप टाकली. पण सांडपाणी कोठून बाहेर पडणार हा खरा प्रश्‍न आहे. येथे  अनेक ठिकाणी रस्ता उंचावर व घरे खड्ड्यात गेल्याने पावसाळ्यात पाणी घरात शिरते. नेहरूनगरमधील नागरिक कागदोपत्री मलकापूरमध्ये असलेतरी त्यांना कराडच्या हद्दीतून बाहेर पडावे लागत आहे.

कराडलगत असलेल्या मलकापूरमधील नेहरूनगरमधील नागरिकांची नोंद मलकापूरमध्ये आहे. मात्र, त्यांना घराबाहेर पडताना कराडच्या हद्दीतून बाहेर पडावे लागत आहे. त्यांना थेट मलकापूरमध्ये जाण्यास रस्ताच नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच नेहरूनगरलगतच असलेल्या कॉलनीमध्ये रस्ता उंचावर अन घरे खड्ड्यात गेल्याने पावसाळ्यात लोकांच्या घरात पाणी शिरते. ही समस्या कायम असून त्यात दिवसेंदिवस भरच पडत आहे. येथे ड्रेनेजची पाईप टाकण्यासाठी रस्त्याची खुदाई करण्यात आली. प्रथम पुर्वेकडून पश्‍चिमेकडे खुदाईकरून पाईप टाकली. पण सांडपाणी तिकडे निघाणार नसल्याचे लक्षात येताच ठेकेदाराने पुन्हा खुदाई करून पश्‍चिमेकडून पुर्वीकडे उतार करून सांडपाण्याची पाईप टाकली. परंतु, पुढे बाजार समितीची जागा असल्याने हे सांडपाणी पुढे कोठे काढले जाणार हा खरा प्रश्‍न आहे. 

भुयारी गटर योजनेचे काम अपुर्ण असल्याने रस्त्यावर किंवा घराशेजारी खड्डे काढले आहेत. अनेक घराच्या परिसरात जोडणी देण्यासाठी सिमेंटच्या टाक्या (आरसीसी चेंबर) आणल्या आहेत. मात्र, या टाक्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने काही चेंबर बसविण्यापुर्वीच फुटल्याचे दिसून येत आहे. फुटलेले चेंबर रस्त्याच्या खाली टाकल्यानंतर ते किती दिवस टिकणार? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यातच अनेक ठिकाणी घराच्या परिसरात चेंबर बसविण्यासाठी जागाच नसल्याने ते रस्त्यावरच बसवावे लागणार आहेत. 

त्यातच राजतारापासून संगम हॉटेलपर्यंत भुयारी गटर योजनेची मुख्य वाहिनी टाकली नसल्याने सांडपाणी ही वाहिनी टाकल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. ते काम अद्याप झालेले नाही. तसेच साधारणपणे एक हजार लोकसंख्ये पाठीमागे खेळाचे मैदान, उद्यान, प्राथमिक शाळा, ग्रंथालय, कम्युनिटी हॉल असने गरजेचे मानले जाते. या वार्डमध्ये खेळाचे मैदान, उद्यान झाले पाहिजे. 
हुतात्मा स्मारक जवळील रिकाम्या जागेवर मैदान व उद्यान उभा करणे शक्य आहे, तशी लोकांची मागणी आहे. तसेच या वॉर्डमध्ये अरुंद रस्ते ही फार मोठी समस्या आहे.  ती सोडविण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. 

ज्येष्ठांसाठी कम्युनिटी हॉल अन पथदिवे...
रस्त्यालगत झाडे लावल्याने मलकापूरची ग्रीन सिटी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. तसेच विकास आराखड्यानुसार शहराचा विकास सुरु असून रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाल्याने रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. भुयारी गटर योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पथदिव्यांची कामे सुरू असून वार्डमध्ये अनेक ठिकाणी पथदिवे लावले आहेत तसेच अनेक ठिकाणी पथदिव्यांची कामे सुरु आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी कम्युनिटी हॉल उभारला असून वार्डमधील 6 ते 7 दिव्यांगाना नगरपंचायतीच्या वतीने मासिक एक हजार रुपये पेन्शन सुरु केली आहे. तसेच सुमारे 20 कुटूंबांना कन्यारत्न योजनेचा लाभ मिळाला असून अंदाजे 15 मुलींना मोफत पास योजनेमुळे शिक्षण घेणे सोयीचे झाले आहे. याशिवाय नगरपंचायतीच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना होत असून सुरु असलेली कामे पुर्ण झाल्यानंतर वार्डची प्रगती नियोजनबध्द होत असल्याचे दिसून येईल.

यांच्या नावाची सुरु आहे चर्चा...
वार्ड क्रमांक दोन सर्वसाधारण गटासाठी खुला आहे. त्यामुळे येथे अनेकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या प्रभागातून विद्यमान नगरसवेक राजेंद्र यादव, शंकरराव चांदे, नितीन काशिद, प्रशांत चांदे, प्रशांत शिंदे, विजेंद्र जाधव यांचा नावाची इच्छूकांमध्ये चर्चा आहे. महामार्गाच्या पुर्वेकडील भाग त्यामध्ये संगम हॉटेल परिसर, कालिदास मार्केट, बालसुधार केंद्र परिसर, हुतात्मा स्मारक परिसर, चांदे वस्ती, नेहरूनगर परिसराच्या यामध्ये समावेश आहे.