Sun, Aug 25, 2019 00:13होमपेज › Satara › डॉ. दाभोलकर हत्येचा संबंध तपासा : हमीद दाभोलकर 

डॉ. दाभोलकर हत्येचा संबंध तपासा : हमीद दाभोलकर 

Published On: Aug 13 2018 1:18AM | Last Updated: Aug 13 2018 1:18AMसातारा : प्रतिनिधी

नालासोपारा बॉम्ब स्फोटके प्रकरणात सातारची लिंक समोर आल्याने सापडलेला स्फोटकांचा साठा व बंदुका कशासाठी गोळा करण्यात आल्या, याचा डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांशी संबंध आहे का, याचा तपास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्ववादी विघातक संघटनांवर कठोर कारवाई करावी, अशी स्फोटक भूमिका ‘अंनिस’चे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी घेतली. या प्रकरणानंतर प्रथमच दै.‘पुढारी’शी ते बोलत होते. 

शुक्रवारी नालासोपारा येथे गावठी बॉम्बसह इतर विघातक साहित्य सापडले असतानाच शनिवारी पुन्हा गावठी कट्टा, पिस्टल याचाही मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आहे. संशयित अटक केलेल्यांमध्ये तिघेही हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. यातील एक सातारचाच असल्याने अवघा जिल्हा सुन्‍न झाला आहे. कारण, दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुणे येथे निर्घृण हत्या झाली. या हत्येनंतर अवघा सातारा, पुणे व महाराष्ट्र हादरला होता. ही हत्या विशिष्ट विचारसरणीतूनच झाली असल्याचा आरोप ‘अंनिस’कडून करण्यात आला होता. दुर्दैवाने मात्र आजही या प्रकरणातील मारेकरी सापडले नाहीत. बंदूक सापडलेली नाही तसेच कोणत्याही संघटनेवर कारवाई झालेली नाही.    

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर विचारवंत, तज्ञ, अभ्यासकांमध्ये सुरुवातीला अस्वस्थता पसरली. मात्र, या घटनेनंतर आजही अंनिससह समाजातील विचारवंतांची विचारांची लढाई सुरुच आहे. दाभोलकरांच्या हत्येनंतर अंनिसकडून तत्काळ कारवाईची मागणी केली होती. दुसरीकडे विचारवंताची लढाई सुरु असताना दुर्दैवाने मात्र डॉ.दाभोलकर यांच्या हत्येनंतर पुढेही डॉ.गोविंद पानसरे, एम.एम.कलबुर्गी, विद्रोही पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्या झाल्या असून हे सत्र सुरुच आहे.

तीन दिवसांपूर्वी नालासोपारा येथे वैभव राऊत याच्याकडे गावठी बॉम्बसह स्फोटके सापडली. त्याने दिलेल्या माहितीवरुन सातारच्या सुधन्वा गोंधळेकर याचेही नाव समोर आले व त्याच्या माहितीवरुन बंदूकींचा अक्षरश: साठाच सापडला. या प्रकरणात सातार्‍यातील युवकाचाही समावेश असल्याचे समोर आल्यानंतर जिल्ह्यात पुन्हा अस्वस्थता पसरली आहे. कारण सुधन्वा हा हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर दै.‘पुढारी’ने डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे सुपुत्र व अंनिस कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या सर्व प्रकरणावरुन सरकार व हिंदुत्ववादी संघटनांवर हल्‍ला चढवला. ते म्हणाले,  तीन दिवसांपूर्वी नालासोपारा येथे जी स्फोटके सापडली आहेत ती खूपच गंभीर बाब आहे. जी कारवाई झाली आहे त्यावरुन तरी शासनाने धडा घ्यावा व कठोर कारवाई करावी, अशी आपली प्रमुख मागणी आहे. सुदैवाने एटीएसने घातपातापूर्वी हा कट उधळला व सर्व स्फोटक साठा जप्‍त केला. यामुळे आता पोलिस व शासनाने हा सर्व साठा कोठून आला? तो कशासाठी वापरला जाणार होता? या पाठीमागे नेमकी कोणती शक्‍ती आहे? हिंदुत्ववादी संघटनांचा नेमका कोणता हेतू आहे? अशा सर्व प्रश्‍नांचा छडा लावून पोलखोल करावी, अशी दुसरी मागणी असल्याचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

डॉ.हमीद दाभोलकर म्हणाले, पाच वर्षांपूर्वी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यावर भ्याड हल्‍ला करुन त्यांची हत्या करण्यात आली. अजूनही त्यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यात यश आलेले नाही. सध्या हे प्रकरण पुणे येथील सत्र न्यायालयात सुरु आहे. सुरुवातीला हे प्रकरण महाराष्ट्र पोलिसांकडे होते आता मात्र या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. सीआयडी तपास करताना त्यांच्यावर उच्च न्यायालयाचे मॉनिटरींग असावे, यासाठी अंनिस उच्च न्यायालयात गेले. सध्या याप्रकरणात विरेंद्र तावडे याला अटक झाली असून अन्य दोघांची नावे जाहीर केली असून ते सापडण्यासाठी सरकारने बक्षीसही जाहीर केले आहे.

ते पुढे म्हणाले, आतापर्यंत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ज्या अशा हत्या झाल्या आहेत त्याच्या पाठीमागे एक विशिष्ट विचारसरणी असल्याचे सर्वश्रुत आहेे. या सर्व हत्यांमागे एकच विचारसरणी असल्याचे समोर आले असून चार्जशीटमध्येही त्याबाबत उल्‍लेख आहे. दुर्दैवाने मात्र याप्रकरणी शासन विघातक कृत्य करणार्‍या कोणत्याही संघटनांबाबत कठोर निर्णय घेत नाही. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांची आतापर्यंत चांगली व जलद कारवाई झालेली आहे. मग महाराष्ट्र सरकार अशा पध्दतीने तपास का करत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.