Sat, Jan 19, 2019 03:46होमपेज › Satara › कोयना प्रकल्पग्रस्त मुंबईला धडकणार 

कोयना प्रकल्पग्रस्त मुंबईला धडकणार 

Published On: Mar 14 2018 12:49AM | Last Updated: Mar 14 2018 12:22AMपाटण : प्रतिनिधी

पंधरा दिवसांपासून कोयना प्रकल्पग्रस्तांचे कोयनानगर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्याने रविवारी (दि. 18)आंदोलनकर्ते आंदोलनस्थळी गुढी उभारून मुंबईला मंत्रालयावर धडक मारणार आहेत, असा इशारा श्रमिक मुक्‍ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी मंगळवारी दिला आहे.  

सावधान कोयना प्रकल्पग्रस्त येत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला या आशयाचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. डॉ. पाटणकर म्हणाले, सत्तेतील सरकार भांडवलदारांचे आहे. 5 लाख कोटींचे कर्ज बुडविणार्‍या भांडवलदारांच्या बैठकीस जाण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ आहे; पण गेली 60 वर्षे आपल्या मागण्यांसाठी हालअपेष्टा सहन करणार्‍या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. शनिवारपर्यंत मागण्यांची दखल घेतली गेली नाही, तर पाडव्या दिवशी  रविवारी आंदोलस्थळी गुढी उभारून  कोयना प्रकल्पग्रस्त मुंबईला चालत निघणार आहेत.

सर्व मागण्या मान्य करूनच परत येणार असा विश्‍वासही डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.  यावेळी हरिश्‍चंद्र दळवी ,संजय लाड, शैलेश सपकाळ, दत्ता देशमुख ,महेश शेलार ,दीपक साळवी,सीताराम पवार संतोष कदम यांचेसह हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.