Fri, Apr 26, 2019 18:15होमपेज › Satara › विमानतळ विस्तारवाढ रेटाल तर खबरदार

विमानतळ विस्तारवाढ रेटाल तर खबरदार

Published On: Aug 15 2018 1:26AM | Last Updated: Aug 15 2018 12:16AMकराडः प्रतिनिधी

कराड विमानतळ विस्तारवाढ कोणत्याही परिस्थितीत होवू देणार नाही, ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. तरीही प्रशासन पुनर्वसनाची कायदेशीर प्रक्रिया डावलून विमानतळ विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आंदोलनाची तागद दाखवून द्यावी लागेल. जबरदस्तीने गेलात तर खबरदार, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते व कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती  समितीचे नेते डॉ. भारत  पाटणकर यांनी प्रशासनाला दिला. दि. 30 ऑगस्ट रोजी  प्रशासना विरोधात इशारा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीचा मेळावा मंगळवारी वारूंजी ता. कराड येथे झाला. तत्पुर्वी डॉ. पाटणकर यांनी विस्तारवाढीसंदर्भात पत्रकारांसमोर आपली भूमीका स्पष्ट केली. 

डॉ. पाटणकर म्हणाले, विमानतळ विस्तारवाढीत वारुंजी, केसे व मुंढे या तीन गावांतील शेती, घरे तसेच भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेवरील शेकडो हेक्टर पिकावू जमीन बाधीत होणार आहे. एकून 50 हेक्टर 52 आर क्षेत्र बाधित होणार असून जवळपास 593 इतके खातेदार शेतकरी आहेत. या शिवाय इतर अधिकारात 207 शेतकरी आहेत. आम्ही विमानतळासाठी कोरेगाव तालुक्यातील निढळ व कराड तालुक्यातील शामगाव येथील पर्याय दिले होते. पुनर्वसन कायद्यानुसार पर्यायी तपासणी होणे आवश्यक असते पण प्रशासनाने तसे काही केलेले नाही. 

कराड विमानतळ विस्तारवाढीबाबतचा पर्याय त्यांनीच परस्पर अंतिम केला आहे. जमीन संपादनाची संयुक्‍त मोजणी अद्याप झालेली नाही. ही मोजणी झाल्याशिवाय पुनर्वसनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही. प्राधिकरणाने पुनर्वसनाचे पॅकेज जाहीर करायचे असते. तसे काही झालेले नाही. मग प्रशासन पॅकेजची भाषा कशी काय करते आहे?

केवळ चार दोन शेतकर्‍यांना बोलावून त्यांना पुनर्वसन पॅकेजचे अमिष दाखवून प्रशासन विमानळ विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न करत आहे. प्रांताधिकार्‍यांनी 28 लोकांचीच बैठक का बोलावली? हा 28 लोकांचा आकडा आला कोठून? ही बैठक कायदेशिर आहे काय? या प्रश्‍नांची उत्तरे प्रशासनाकडे नाहीत. 2015 ते 2018 चे दरम्यान कोणतीच प्रक्रिया चालू नसताना अचानक प्रांताधिकारी बैठक घेतात, हा काय प्रकार आहे? ही हुकूमशाही नव्हे.

जर तुम्ही जबरदस्तीने ही विस्तारवाढ करणार असाल तर याद राखा. या प्रश्‍नावर यापूर्वी अनेक आंदोलने, मोर्चे झाले आहेत. हे आंदोलन भविष्यात अधिक तीव्र करण्यात येईल. याचाच पहिला टप्पा म्हणून येत्या दहा दिवसात प्रशासना विरोधात इशारा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले. प्रशासनाने आम्हाला सोन्याची घरे दिली तरी आम्ही घेणार नाही. विमानतळ विस्तारवाढ  होवू देणार नाही.