Fri, May 24, 2019 20:32होमपेज › Satara › पंढरपूरला देशातील अव्वल तीर्थक्षेत्र बनवणार

पंढरपूरला देशातील अव्वल तीर्थक्षेत्र बनवणार

Published On: May 31 2018 1:47AM | Last Updated: May 31 2018 1:47AMकराड : प्रतिनिधी 
पंढरपूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदास राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्यानंतर समितीचे विद्यमान अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांचे बुधवारी सायंकाळी कराडात (जि. सातारा) जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास अभिवादन केल्यानंतर ना. भोसले यांनी पंढरपूरला देशातील अव्वल तीर्थक्षेत्र बनवणार असल्याची ग्वाही दिली.

कराड येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांसह कराड नगरपालिकेतील भाजपा तसेच जनशक्‍ती आघाडीच्या नगरसेवकांनी डॉ. भोसले यांचे जंगी स्वागत केले. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते.कोल्हापूर नाक्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रॅलीद्वारे कार्यकर्त्यांसह जाऊन पुष्पचक्र अर्पण करून ना. डॉ. भोसले यांनी अभिवादन केले. तसेच स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केल्यानंतर ना. डॉ. भोसले यांनी पंढरपूर येथील सर्वसामान्य भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत पंढरपूर तीर्थक्षेत्र देशातील अव्वल दर्जाचे तीर्थक्षेत्र बनवण्याची ग्वाही दिली.

विठ्ठल व रूक्मिणी माता यांना वंदन करत ना. डॉ. अतुल भोसले यांनी मागील वर्षी आपली मंदिर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर दर्शनासाठी दररोज येणार्‍या भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून टोकन पद्धतीचा क्रांतिकारी निर्णय घेतला. 

आषाढी एकादशीपर्यंत ही टोकन व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यासाठी आपण आपल्या सर्व सहकार्‍यांसह प्रयत्नशील आहोत.  राज्यासह देशातील वारकर्‍यांच्या मंदिर समितीकडून असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणे हे आपले प्रमुख ध्येय आहे. मुख्यमंत्र्यांनी मंदिर समितीच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रीचा दर्जा दिला आहे. भविष्यात याचा मोठा फायदा पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी होणार आहे.