Sun, Jul 21, 2019 07:57होमपेज › Satara › डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडेंच्या नावांवर भाजपकडून शिक्‍कामोर्तब

डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडेंच्या नावांवर भाजपकडून शिक्‍कामोर्तब

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 11:02PMकराड: वार्ताहर

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील भाजपचा उमेदवार ठरविण्याचा सर्वाधिकार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिलेला आहे. त्यास अनुसरूनच शनिवारी सकाळी सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार योग्य वेळी जाहीर करू, अशी भूमिका घेणार्‍या महसूलमंत्र्यांनी त्याच दिवशी रात्री उशिरा जिल्ह्यातील कराड दक्षिणमधून डॉ. अतुल भोसले आणि कराड उत्तरमधून मनोज घोरपडे या उमेदवारांची नावे जाहीर करताना मात्र कोणताही संभ्रम शिल्लक ठेवला नाही.

राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ आणि पक्ष पातळीवरही कोल्हापूरचे भाजप नेते आणि विद्यमान महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना मानाचे स्थान प्राप्त झाले. गेल्या साडे तीन वर्षात त्यांनी आपल्या कर्तुत्वाची छाप पाडत आपले स्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मनापासून ते भाजप आणि त्या पक्षाची मातृसंस्था असलेल्या आर.एस.एस. मध्येही अधिक भक्कम केले आहे. यातूनच पश्‍चिम महाराष्ट्र सोडाच पण राज्याच्या राजकारणातही त्यांच्या मताला अनन्यसाधारण महत्व आहे.

गेल्या साडेतीन वर्षातील राज्याच्या सत्तेचा जास्तीत जास्त उपयोग पश्‍चिम महाराष्ट्रासाठी करण्याचा प्रयत्न करताना पायाला भिंगरी लावून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात फिरताना ते दिसतात. भाजप मजबूत करीत असताना स्वतःचा विधानपरिषदेचा पुणे पदवीधर मतदारसंघ स्वतःसाठी अधिकाधीक कसा सुरक्षित होईल, याकडे त्यांचे बारीक लक्ष नसेल तरच नवल. याच व्युहरचनेतून पुणे पदवीधर मतदारसंघातील समाविष्ट पाचही जिल्ह्यात लोकांशी थेट संपर्क असणारे जास्तीत जास्त तगडे उमेदवार ते येणार्‍या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत देण्याच्या प्रयत्नात ते आहेत.

कराड नगरपरिषदेच्यावतीने आयोजित आढावा बैठकीत मनोदय व्यक्त करीत असताना चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेतृत्वाखालील राज्य सरकार विकासकामे करताना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या पक्षाची अथवा विचाराची सत्ता आहे का हे न पाहता लोकांकडे पाहून विकासकामे करीत असते, असे सांगितले. त्यामुळे निधी देताना तुम्ही आमच्या उमेदवारांनी सहकार्य करा असे आता बोलण्याची गरज नाही. मात्र येणार्‍या निवडणुकीत या विकासकामांच्या आधारेच लोक कराड दक्षिणमध्ये डॉ.अतुल भोसले आणि कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे यांना साथ करतील असे बोलून गेले. यामुळे आपसुकच त्यांच्या मनातील भावना आणि पक्षाचा निर्णय ओठातून बाहेर पडला.

कराड दक्षिणमध्ये गेल्या निवडणुकीवेळी सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनीही उमेदवारी मागितली होती. येणार्‍या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना भाजप उमेदवारीची अपेक्षा होती. तर राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना.शेखर चरेगावकर यांच्याही नावाची तगडे उमेदवार म्हणून चर्चा व्हायची. आता मात्र यावर पडदा पडेल. तर कराड उत्तरमध्ये पुसेसावळीचे जितेद्र पवार (खटावमधून विधानसभेची 2004 ची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवलेले), कोपर्डे हवेली जि.प.मतदारसंघातून निवडणूक लढवलेले भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्यासह अद्याप भाजपात प्रवेश न केलेल्या आणखी एक दोन युवा नेत्यांच्या नावांची चर्चाही व्हायची. मात्र ना.चंद्रकांत पाटील यांच्या तोंडून आलेल्या स्पष्ट नावांनंतर आता याबाबतचा संभ्रम पुर्णपणे दूर झाला आहे.

कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या निवासस्थानी झालेला कार्यक्रम नगरपरिषदेच्या विकासकामांची आढावा बैठक या नावाखाली झाली असली तरी या बैठकीतून भाजपचे कराड दक्षिणमधील संभाव्य उमेदवार डॉ,अतुल भोसले यांची ताकद वाढविणेचा प्रयत्न यशस्वी होताना स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेस उमेदवार आ.पृथ्वीराज चव्हाण यांना साथ करणार्‍या जनशक्ती आघाडीतील बहुतांश नेते व नगरसेवक आज डॉ.अतुल भोसले यांच्यासोबत दिसले. जनशक्ती आघाडीने याबाबतची घोषणा केली नसली तरी आघाडीच्या नेत्यांच्या दैनंदिन व्यवहारातून त्याचे संकेत मात्र स्पष्टपणे दिसत आहेत.

रात्रीच्या आढावा बैठकीत कराडमधील जनशक्ती आणि भाजप नगरसेवक व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबरच कालेचे दयानंद पाटील, रेठरेचे पै. आनंदराव मोहिते, भाजपचे कराड दक्षिण अध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, पै.धनाजी पाटील-आटकेकर व अन्य डॉ.अतुल भोसले समर्थक, मलकापूरचे अशोकराव थोरात, सैदापुरचे युवानेते मोहनराव जाधव, शहरातील मुकूंद चरेगावकर, माधवराव पवार, दिलीपराव घोडके, घनश्याम पेंढारकर, फारुकभाई पटवेकर, अ‍ॅड.विजय पाटील, ज्ञानदेव राजापुरे, संतोष सारडा, हणमंतराव निर्मळ यांच्यासह बैठकीत सहभागी नगरसेवकांची निकटवर्तीय मंडळींची उपस्थितीही लक्षवेधी होती.