Thu, Apr 18, 2019 16:35होमपेज › Satara › पंढरपूरला संत विद्यापीठ उभारणार : ना. डॉ. अतुल भोसले 

पंढरपूरला संत विद्यापीठ उभारणार : ना. डॉ. अतुल भोसले 

Published On: May 31 2018 1:47AM | Last Updated: May 31 2018 1:47AMसातारा : प्रतिनिधी

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्राचा व परिसराचा कायापालट करणार असून जगाला हेवा वाटावे असे ‘संत विद्यापीठ’ उभारण्याचा मानस देवस्थानचे अध्यक्ष व नवनियुक्‍त राज्यमंत्री दर्जा प्राप्‍त झालेले डॉ. अतुल भोसले यांनी  सातारच्या दै.‘पुढारी’ कार्यालयात व्यक्‍त केला. दरम्यान, पंढरपूरच्या स्वच्छतेसह, नदीपात्राची स्वच्छता, स्कायवॉक अशा विविध संकल्पनांच्या पूर्तीसाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांना मंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यानंतर लागलीच ते सातार्‍यात आले. आल्या आल्या  सातारच्या दै.‘पुढारी’ जिल्हा कार्यालयात येवून त्यांनी ‘पुढारी’कार  पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना अभिवादन केले. विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरिष पाटणे, जाहिरात व्यवस्थापक नितीन निकम यांनी त्यांचे  शाल, बुके देऊन व कंदी पेढा भरवून  स्वागत व अभिनंदन केले. यावेळी त्यांनी दै.‘पुढारी’ टीमशी संवाद साधून आगामी वाटचालीची माहिती दिली. 

डॉ. अतुल भोसले म्हणाले, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर विश्‍वास टाकत पंढरपूर देवस्थानचे अध्यक्षपद दिले. अध्यक्षपद आल्यानंतर सर्वप्रथम तेथील समिती सदस्य, मंदिरातील कर्मचारी, भाविक, स्थानिकांशी सतत सुसंवाद ठेवला. केवळ अध्यक्षपद घेवून न मिरवता या सर्व घटकांसाठी काहीतरी देता आले पाहिजे हा विचार केला. त्यातूनच देवस्थानच्या कामकाजाची माहिती करून घेतली. देशातील बालाजीसारख्या प्रमुख देवस्थानांना भेटी देऊन  तेथील कार्यपद्धतीची माहिती घेतली. मोठी व महत्त्वपूर्ण देवस्थान कशा पध्दतीने काम करत आहेत त्याचा अभ्यास करून पंढरपूर देवस्थानच्या विकासासाठी कृतीआराखडा निश्‍चित केला.  त्यानुसार एकेक सुधारणावादी पाऊल टाकत कायापालट करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले.

देवस्थान समितीचे अध्यक्षपद आल्यानंतर टेंडर पध्दतीमध्ये पारदर्शकपणा येण्यासाठी  पीडब्ल्यूडीकडून ई टेंंडरींग प्रक्रिया राबवण्यात आली. तो विभागही काही गडबड करणार नाही यासाठी समितीकडून मॉनिटरींग  ठेवण्यात आले. यामुळे प्रत्येक टेंडरमध्ये पारदर्शकता व सुसुत्रता आली.  देवस्थानासाठी ज्या प्राथमिक गरजांची आवश्यकता आहे त्यासाठी दानशूर व्यक्‍ती, भक्‍त, देणगीदार यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. यामध्ये एटीएम वॉटर सेंटरसह विविध बाबींचा समावेश आहे. सर्वात महत्वाचे विठ्ठलाचे दर्शन हा विषय असून त्यासाठीही टोकण पध्दत राबवली जाणार आहे. यामुळे एका दिवसात ठराविक भाविकांना दर्शनाचा लाभ देता येणार आहे. या प्रक्रियेमुळे भाविकांना रांगेमध्ये तासन्तास ताटकळत उभे राहण्याची गरज लागणार नाही. दिलेल्या वेळेत दर्शन घेवून लगेच मार्गस्थ होता येणार आहे. 

पंढरपूरमध्ये येणार्‍या  भक्‍तांना रहदारीचा फटका बसू नये व त्यांची सुरक्षितता अबाधित रहावी, यासाठी थेट स्कायवॉकचेही नियोजन करण्यात येत आहे. यातील बहुतेक कामकाजांसाठी समितीच्या माध्यमातून कामे  करत असताना भक्‍त, देणगीदार यांच्या माध्यमातून हा निधी उभारला जाणार आहे. त्यासाठी शासनाच्या निधीची आवश्यकता लागणार नाही. पंढरपूर तीर्थक्षेत्राची महती सातासमुद्रपार जावी, यासाठी संपूर्ण संशोधनात्मक संत विद्यापीठ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारत देशासह परदेशी पाहुण्यांनाही या विद्यापीठातून अध्यात्मिक संशोधनासाठी व्यासपीठ उभारण्यास मदत होणार आहे. हा आपला ड्रिम पोजेक्ट असून यासाठी विविध स्तरावर माहिती घेवून त्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवातही केली असल्याची माहिती डॉ. अतुल भोसले यांनी दिली.