Sun, Jul 21, 2019 06:03होमपेज › Satara › गावचा नंबर आला नाही तरी चालेल, पण शिवारात पाणी खळाळलं पाहिजे

गावचा नंबर आला नाही तरी चालेल, पण शिवारात पाणी खळाळलं पाहिजे

Published On: May 25 2018 1:12AM | Last Updated: May 24 2018 7:42PMहिंगणी : वार्ताहर

गत वर्षी मिळालेल्या अपयशाने खचून न जाता मोठ्या जिद्दीने किरकसाल गाव पाणी फाऊंडेशनच्या कामात सहभागी झाले. गावात मोठ्या प्रमाणात पाणी फाऊंडेशनची कामे झाली आहेत. ही स्पर्धा संपल्यानंतर नंबर मिळो ना मिळो पण गावातील शिवारांमध्ये पाणी खळाळलं पाहिजे, अशी भावना किरकसाल ग्रामस्थांनी झाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून  आपल्याला हक्‍काचे पाणी मिळणार याचे समाधान ग्रामस्थांना मिळणार आहे. 

मंगळवारी वॉटर कप 

स्पर्धेचा शेवटचा दिवस होता. 22 दिवस गावात झालेल्या श्रमदानामध्ये लहानांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता. राज्यात नंबर 1 साठी जी गावे स्पर्धेत होती त्यामध्ये किरकसालचेही नाव होते. सरपंच अमोल काटकर यांच्या नेतृत्वाखाली लोक श्रमदान करत होते. गावातील सर्व लोकांचे जलसंधारणामुळे मनसंधारण होऊन एकी झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी नंबर नाही आला तरी न खचता परत ह्या वर्षी ते स्पर्धेत उतरले आहेत. ‘नंबर मिळो न मिळो’कायमचे हक्‍काचे पाणी  मिळणार आहे. पुढील वर्षी सुद्धा उरलेल्या शिवारात काम करून पूर्ण गाव पाणीदार करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 

गतवर्षीच्या जलसंधारण कामामुळे भूजल पातळीत वाढ होऊन गावात पाण्याची उपलब्धता झाली आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातून अनेक गावांनी किरकसालच्या आदर्श कामाला भेटी दिलेल्या आहेत. ज्यांना जलसंधारणाची कामे करायची आहेत त्या गावांनी काम सुरू करण्यापूर्वी नक्‍की किरकसाल गावाला भेट द्यावी, असे आवाहन काटकर यांनी केले आहे. गावात रोज श्रमदान करायला येणार्‍या महिलांना पैठणी व पुरुषांना टायटनचे घड्याळ याचा लकी ड्रॉॅ काढला गेला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये श्रमदानासाठी एक उत्साह निर्माण झाले. मागील वर्षी सहभाग असल्यामुळे नंबर आला नाही तरी चालेल पण पूर्वीपेक्षा अधिक  पाणीसाठा झाला पाहिजे ही मानसिकता रूजत चालली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये मनसंधारणाबरोबर पाण्याचे महत्त्व पटत चालले आहे.