Wed, Apr 24, 2019 07:32होमपेज › Satara › सात-बारा उतारा नको, पण त्रास थांबवा

सात-बारा उतारा नको, पण त्रास थांबवा

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 29 2018 10:34PMढेबेवाडी : प्रतिनिधी

राज्य शासनाने गाव पातळीवरील महसूल दप्तर संगणकीकरणाचा निर्णय घेतला आहे. पण बेजबाबदार प्रशासकीय अधिकार्‍यांमुळे सातबारा उतार्‍यांवरील चुकांची दुरूस्ती होऊनही तीन तीन महिने सुधारित सातबारा मिळण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळेच ‘उतारा नको, पण त्रास थांबवा’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर विशेषत: शेतकर्‍यांवर आली आहे.

याबाबत पवारवाडी (तारूख, ता. कराड) येथील एक युवा शेतकरी निवास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानी पवारवाडी येथील गट नंबर 3 आणि 21 मधील काही क्षेत्र 20 मार्च 2017 रोजी खरेदी केले. तो खरेदी दस्त गाव कामगार तलाठ्याकडे नोंदीसाठी दिल्यानंतर त्यावरून तलाठ्याने नोंदीसाठी फेरफार नंबर 116 घातला. मंडलाधिकारी कोळे (ता. कराड) यांनी सदर फेरफार उपलब्ध दस्तावरून तो फेरफार ग्राह्य धरून 11 एप्रिल 2017 ला मंजूर केला. त्यानंतर सातबार्‍यावर निवास पवार यांचे नाव दाखल करून 15 मे 2017 रोजी त्यांना संगणकीकृत  उतारा दिला. जानेवारी 2018 मध्ये निवास पवार यांनी त्यांचा खाते उतार व संगणकीकृत सातबारा उतार्‍याची मागणी केली. मात्र त्यावेळी सातबारा उतार्‍यावर निवास पवार यांच्या नावाची नोंदच नाही. त्यामुळे त्यांना त्या उतार्‍याचा काही उपयोगच नाही. 

त्यानंतर पवार यांनी आपली नोंद कमी झाली कशी? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मिळालेल्या माहितीनुसार खरेदी दस्तावरून घातलेला फेरफार नंबर 116 मंजूर झाला व तो संगणकावर घेऊन उतारा सोडला. 

पण त्याची नोंद तलाठ्याकडे असलेल्या सातबाराच्या पुस्तकांवर धरलीच नाही. त्यामुळे नंतर जेव्हा गावाचे संपूर्ण सातबारा संगणकीकृत केले, तेव्हा ‘आठ अ’वरून खाते संगणकावर घेतले. पण पुस्तकातल्या सातबारावर नाव नाही, म्हणून संगणकावर ते घेतलेच नाही. पण आधी संगणकावर असलेले नावही कमी केले. याप्रकरणी आता कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. याबाबत कराडच्या तहसिलदारांकडे 31 जानेवारी 2018 ला अर्ज केल्यानंतर त्यांनी 9 फेब्रुवारीला मंडलाधिकारी कोळे यांना या प्रकरणाची चौकशी करून नोंद करण्याचा आदेश दिला. मंडलाधिकारी यांनी 27 फेब्रुवारीला तलाठ्याला आदेश दिला. मात्र अजूनही काहीच हालचाल झालेली नाही. या सर्व घोळात निवास पवार यांना गेल्या चार महिन्यापासून सातबारा उतारा मिळत नाही.