होमपेज › Satara › माऊलींच्या प्रस्थानाने जिल्हावासीयांना हुरहुर

माऊलींच्या प्रस्थानाने जिल्हावासीयांना हुरहुर

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 10:47PMफलटण : यशवंत खलाटे

आषाढी वारीसाठी आळंदीहून पंढरपूरकडे निघालेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा संपूर्ण वाटचालीपैकी आर्धेअधिक अंतर पार करून सोमवारी सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड, ता. फलटण येथील मुक्‍कामासाठी प्रशस्त पालखी तळावर विसावला. त्यापूर्वी बरडच्या वेशीवर विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, बरड व परिसरातील ग्रामस्थांनी माऊलींचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. दरम्यान, हा सोहळा आज  सोलापूर जिल्ह्यात प्रस्थान करणार   असल्याने सातारा जिल्हावासीयांना हुरहुर लागून राहिली आहे. 

सोहळा फलटण येथील प्रशस्त पालखी तळावरून बरडकडे मार्गस्थ होण्यापूर्वी पहाटेच्या नगार्‍याने भाविक, वारकर्‍यांना जाग आली. पहाटे माऊलींना पवमान पूजा व रुद्राभिषेक घालण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे या पूजेस नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर व अन्य मानकरी उपस्थित होते. परंपरागत पद्धतीने पूजा अभिषेक आणि माऊलींच्या चरणी सव्वा लाख तुळशी अर्पण करण्यात आल्या.

सोमवारी  सकाळी  6.30 वाजता माऊलींचा  सोहळा वैभवी  लवाजम्यासह बरड मुक्‍कामासाठी मार्गस्थ झाला. शहराच्या मध्यवर्ती भागातील संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली मंदिरासमोर नाईक-निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. 

आळंदी संस्थानचे ट्रस्टी व सोहळ्यातील मानकरी आणि दिंडीप्रमुखांना साखरेचा पुडा व नारळ देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सकाळच्या वेळी सुरु असलेल्या भजन व अभंगाला वेगळाच रंग चढला. दरम्यान सकाळी 9.45 वाजता सोहळा विडणी येथे पोहोचला वेशीवर ग्रामस्थांच्यावतीने मान्यवरांनी सोहळ्याचे उत्साही स्वागत केले. त्यानंतर सकाळच्या न्याहरीसाठी सोहळा विडणी हद्दीत विसावला. 

सोहळा दुपारी 2 वाजता वाजेगाव फाटा येथील विसाव्याकडे मार्गस्थ झाला. वाजेगाव फाटा येथे निंबळक, गुणवरे, आसू, पवारवाडी गोखळी, खटकेवस्ती परिसरातील भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. त्यानंतर सोहळा सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरडकडे मार्गस्थ झाला. 

दरम्यान, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड,  प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर माने, विस्तार अधिकारी बाचल, ग्रामसेवक डी.एस.भोसले तसेच पंचायत समिती सदस्य नानासाहेब लंगुटे, सरपंच सौ. तृप्ती संतोष गावडे व ग्रामपंचायत सदस्य आणि बरड व परिसरातील ग्रामस्थांनी माऊलींचे मोठ्या उत्साहात भक्तीभावाने स्वागत केले.

सोहळ्याला आज जिल्ह्याचा निरोप 

बरड येथील मुक्‍कामानंतर  मंगळवारी (दि. 17) सोहळा सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने माऊलींचे स्वागत आणि सातारा जिल्ह्याच्या वतीने माऊलींना निरोप असा भावपूर्ण कार्यक्रम होणार असून त्यावेळी दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, दोन्ही जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी विविध मान्यवर, संस्थांचे पदाधिकारी आणि दोन्ही जिल्ह्यांतील भाविक, ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.