Fri, May 24, 2019 06:59होमपेज › Satara › सातार्‍यात माऊलींचा आज पालखी सोहळा(व्हिडिओ)

सातार्‍यात माऊलींचा आज पालखी सोहळा(व्हिडिओ)

Published On: Jul 12 2018 6:58PM | Last Updated: Jul 12 2018 10:37PMलोणंद : शशिकांत जाधव

श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज शुक्रवार दि. 13 जुलै रोजी दुपारी 2 च्या सुमारास सातारा जिल्ह्यातील चार मुक्‍कामांसाठी आगमन होत असून, माऊलींच्या स्वागताची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. माऊलींनी सातारा जिल्ह्यात आगमन करण्यापूर्वी निरा नदीच्या पात्रात पाडेगाव बाजूच्या तीरावर श्री दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात येणार आहे. शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र आराखड्यातून दत्त घाटाचे सुशोभिकरण करण्यात आले असून सिमेंटचा रस्ता, घाटावर पायर्‍या, निरा स्नानासाठी लोखंडी बॅरिकेट अशा सुविधा केल्याने माऊलींचे निरा स्नान आनंदी व भक्‍तिमय वातावरणात होणार आहे. तर निरा नदीत निरा स्नानासाठी वीर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे पालकमंत्री विजय शिवतारे, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. दीपक चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, आ. शंभुराज देसाई, आ. आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नितीन थाडे,  जि.प. अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार, जि.प. सदस्य दीपाली साळुंखे, उदय कबुले, खंडाळा पंचायत समिती सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदनाताई धायगुडे, सदस्य राजेंद्र तांबे, अश्‍विनी पवार, चंद्रकांत यादव, शोभा जाधव, प्रांत अस्मिता मोरे, पोलिस उपअधीक्षक डॉ.अभिजित पाटील, तहसीलदार विवेक जाधव, गटविकास अधिकारी दीपा बापट, सपोनि गिरिश दिघावकर, शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटील, नितीन भरगुडे, आनंदराव शेळके, रमेश धायगुडे, पुरूषोत्तम जाधव, राहुल घाडगे, संभाजी घाडगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

माऊलींचा पालखी सोहळा निरा येथून दुपारी 1.30 च्या सुमारास प्रस्थान ठेवल्यानंतर निरा नदीवरील जुन्या पुलावरून पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल . निरा नदीच्या पाडेगाव तिरावर माऊलींचा रथ थांबल्यावर माऊलींच्या पादुकांना निरा नदीत निरा स्नान घालण्यासाठी नेण्यात येतील. शासनाच्यावतीने तीर्थक्षेत्र आराखड्यातून दत्त घाटाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे त्यामध्ये जुन्या पुलापासून घाटापर्यंत सिमेंटचा रस्ता, घाटावर पायर्‍या, निरा स्नानासाठी नदीत चबुतरा, लोखंडी बॅरिकेट, सभा मंडप, भक्ती निवास आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. दत घाटाचा परिसर मुरुम टाकुन सपाटीकरण करण्यात आले आहे तर निरा नदीतील शेवाळ व अन्य घाण स्वच्छ करण्यात आली आहे.

निरा स्नानासाठी वीर धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले आहे. तर आळंदी पासून निघालेल्या वारकर्‍यांना निरा नदीत चांगल्याप्रकारे आंघोळ करता येणार आहे.माऊलींचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पाडेगाव टोल नाक्याजवळ जिल्ह्याच्यावतीने अधिकारी व पदाधिकारी स्वागत करणार आहेत या ठिकाणी गर्दी गोंधळ होऊ नये म्हणून पोलीसांच्यावतीने दोरी लावून कडे करण्यात येणार आहे तर सर्वांना गुलाब पाकळ्या देऊन स्वागत करण्याचे नियोजन तहसिलदार विवेक जाधव यांनी केले आहे. कार्यकर्त्यांनी प्रोटोकॉल नुसार आपले वर्तन ठेवावे अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली. या ठिकाणी गोंधळ, ढकला ढकली, होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे.माऊलींच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून माऊलींच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे.