Tue, Mar 19, 2019 20:35होमपेज › Satara › सवलत पाससाठी दिव्यांगांची फरफट

सवलत पाससाठी दिव्यांगांची फरफट

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 10:24PMसातारा : मीना शिंदे

एसटी महामंडळाच्या सातारा मध्यवर्ती बसस्थानकात हिरकणी कक्षात दिव्यांगांना सवलत पास देण्याचे कार्यालय थाटले असले तरी याठिकाणी संबंधित कर्मचारी हजर राहत नसल्याने दिव्यांगांना पाससाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. दुपारी एक-दीडपर्यंत या कक्षाला कोणी वाली नसल्याचा प्रत्यय अनेकदा येऊ लागल्याने दिव्यांगांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून दिव्यांगांना सवलतीचे प्रवास पास देण्यासाठी हिरकणी कक्षातच सोय केली आहे. सातारा शहर व तालुक्यातील सर्व दिव्यांग व अपंगांना प्रवास पास दिले जात असल्याने सर्वजण पाससाठी सकाळी दहा वाजल्यापासून येत असतात. मात्र, या कार्यालयात संबंधित अधिकारी व कर्मचारी  यांचा दुपारपर्यंत पत्ताच नसतो. त्यामुळे दिव्यांगांना ताटकळत बसावे लागते. कार्यालयात आल्यावरही हे कर्मचारी  फार वेळ जागेवर नसतात. त्यामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग नागरिक उपासपोटी या कर्मचार्‍यांची वाट पहात  थांबत असतात. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मुळातच हिरकणी कक्षाचा उद्देश स्तनदा मातांना प्रवासादरम्यान  बसस्थानकामध्ये लहान बाळाला स्तनपान करता यावे हा आहे. बस स्थानकामध्येे सर्व सुविधांनी युक्त  उत्तम हिरकणी कक्षाची स्थापना करण्याची सूचना शासनाने बंधनकारक केल्या होत्या. त्यानुसार सातारा विभागातील 11 आगारात हिरकणी कक्षाची विविध सोयीसुविधांनी युक्त कक्षाची स्थापना करण्यात आली. प्रत्यक्षात या कक्षात कार्यालयीन कामकाजाचाच गाजावाजा सुरु आहे. अनेक महिला प्रवाशांना  हिरकणी कक्ष शोधता-शोधता दमछाक होत आहे. हा कक्ष सापडल्यावरही त्यांची निराशाच होत आहे.

नावापुरता उरलेल्या या कक्षात दिव्यांग व अपंगांना सुविधा देण्यासाठीही तीन वर्षांपासून टेबल लावले आहे. मात्र, या कक्षामुळे ना मातांची सोय होते ना दिव्यांगाची. त्यामुळे हिरकणी कक्षात स्तनदा मातांची सोय करून दिव्यांगासाठी वेगळा कक्ष देवून पूर्णवेळ कर्मचारी द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.