Thu, Jun 27, 2019 17:48होमपेज › Satara › समाजकल्याणकडून दिव्यांगांची हेळसांड

समाजकल्याणकडून दिव्यांगांची हेळसांड

Published On: Feb 27 2018 1:56AM | Last Updated: Feb 26 2018 11:04PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून सोमवारी  जिल्हाभरातून ओळखपत्रासाठी आलेल्या दिव्यांगाची हेळसांड करण्यात आली. अधिकारी  व कर्मचार्‍यांच्या  धमकीमुळे अनेक दिव्यांगांनी ओळखपत्राअभावी घर गाठणे पसंत केले. दरम्यान, याबाबत काहींनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सायंकाळनंतर ओळखपत्र देण्यास सुरूवात करण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील अनेक दिव्यांग समाजकल्याण विभागाकडून ओळखपत्र मिळावे यासाठी ऑनलाईन अर्ज करत असतात. अर्ज केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत त्यांना रितसर ओळखपत्र देण्यात येते. समाजकल्याण विभागाने दिव्यांगांना ओेळखपत्र देण्यासाठी सोमवार हा दिवस ठरवलेला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून सुमारे 150 हून अधिक दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र  घेण्यासाठी जिल्हा परिषदेत आल्या होत्या. कार्यालयातही कोणी अधिकारी व कर्मचारी नव्हते. काही वेळाने ओळखपत्रासाठी संबंधित अधिकार्‍यांकडे या व्यक्ती गेल्या असता त्यांना तुम्ही बाहेर जावून बसा असे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक व्यक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील हिरवळीवर बसल्या होत्या. आता ओळखपत्र मिळेल, मग ओळखपत्र मिळेल, या आशेवर ते बसले होते. 

शेवटी संतप्त झालेल्या नागरिकांनी  समाजकल्याण विभागातील अधिकार्‍यांना ओळखपत्र कधी मिळणार? अशी विचारणा केली असता अधिकार्‍यांनी त्यांच्याशी उद्दटपणाची वर्तणूक केली. सायंकाळी 5 नंतर तुम्हाला ओळखपत्र मिळेल? तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा दमही संबंधित अधिकार्‍यांनी या दिव्यांगाना भरला. आम्ही ऑनलाईन अर्ज भरला असल्याने आम्हाला उद्या ओळखपत्र मिळेल का? 

अशी काहींनी विचारणा केली. मात्र, अधिकार्‍यांनी तुम्हाला ओळखपत्र मिळणार नसल्याचे सुनावले. त्यामुळे  अधिकार्‍यांच्या या धमकीमुळे काही जणांनी निघून जाणेच पसंत केले. 

अनेक दिव्यांगांची घरची परिस्थिती हलाकीची आहे. पै पै उसने घेवून ओळखपत्र मिळेल या आशेवर ते जिल्हा परिषदेत आले होते. मात्र, त्यांच्या हाती ओळखपत्रही आले  नाही, अलट अधिकार्‍यांची दमबाजीच आली. समाजकल्याणच्या या तुघलकी कारभारामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या दिव्यांगांची एकप्रकारे हेळसांड झाली.  त्यामुळे शिस्तीचा बडगा उघडणारे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, समाजकल्याण विभागाकडून काही दिव्यांगांना सायंकाळनंतर ओळखपत्रे देण्यात आली.