Thu, Jun 20, 2019 21:53होमपेज › Satara › लाच घेताना मंडल अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

लाच घेताना मंडल अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

Published On: Jun 05 2018 1:18AM | Last Updated: Jun 04 2018 11:28PMसातारा : प्रतिनिधी

ऐपतदार दाखला (सॉल्वन्सी सर्टिफिकेट) व त्यासाठी नाहरकत दाखला देण्यासाठी 500 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वर्ये (ता. सातारा) येथील मंडल अधिकारी वैभव राजाराम माळी (वय 45, मूळ रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. दरम्यान, सोमवारी दुपारी ही कारवाई सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाजवळ झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली.

पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांना ऐपतदार व नाहरकत दाखल पाहिजे होता. यासाठी वर्ये ता.सातारा येथील सर्कल अधिकारी वैभव माळी याला ते भेटले. मात्र, संबंधित काम करण्यासाठी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा एसीबी कार्यालयात तक्रार दिली. सोमवारी लाचेची रक्‍कम घेण्याचे ठरल्यानंतर लाचलुचपत प्रतिबधंक विभागाने सापळा रचला. या सापळ्यामध्ये माळी अलगद सापडला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दरम्यान, लाचेची रक्‍कम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वीकारल्यानंतर परिसरात चर्चेला अक्षरश: उधाण आले. एसीबीचा ट्रॅप झाल्याची माहिती वार्‍यासारखी पसरल्यानंतर याठिकाणी अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली. अखेर मंडलाधिकारी असल्याचे समोर आल्यानंतर अनेकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. मंडलाधिकारी 500 रुपयांचीही लाच घेत असल्याने प्रशासन किती निगरगट्ट आहे, हेच समोर आले आहे. संशयित वैभव माळी याला रात्री उशीरा अटक करण्यात आली असून मंगळवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांकास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस उपअधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संभाजी बनसोडे, भरत शिंदे, तेजपाल शिंदे, संजय साळुंखे,विनोद राजे, संभाजी काटकर, विशाल खरात, मधुमती कुंभार, निलीमा जमदाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.