Thu, Apr 25, 2019 03:25होमपेज › Satara › वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण खटाव तालुका

वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण खटाव तालुका

Published On: Jun 30 2018 1:20AM | Last Updated: Jun 29 2018 9:03PM- पद्मनिल कणसे, वडूज

मायणीचे इंदिरा गांधी राष्ट्रीय पक्षी आश्रयस्थान, औंधचे पुराण वस्तू व दुर्मिळ चित्र, ग्रंथ संग्रहालय तसेच पुसेगाव, सिद्धेश्‍वर कुरोली, औंध, मायणी आदी प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे व तेथे भरणार्‍या भल्या मोठ्या यात्रा, वर्धनगड, भूषणगड आदी ऐतिहासिक किल्ले, 1942 च्या स्वातंत्र्य लढ्याची समरगाथा सांगणार्‍या शहीदांच्या स्मरणार्थ वडूजसह  तालुक्यात सात ठिकाणी उभारलेली हुतात्मा स्मारके, 33 कोटी देवांची प्रतिकृती असणारा जयराम स्वामींचा वडगावमधील मठ आदी विविध वैशिष्ट्यांनी बहरलेला आणि दुष्काळावर  मात करून विविध क्षेत्रात बौद्धिक चमक सिद्ध करणारा खटाव तालुका संपूर्ण महाराष्ट्रात आपले वेगळेपण जपून आहे.

तीर्थक्षेत्रे ः-  औंध - इ.स. 1300 वर्षांपूर्वी  चालुक्य राजघराण्यातील मूळ पुरुषाने औंध वसविले. पंतप्रतिनिधी घराण्याच्या अधिपत्याखालील औंध संस्थानचा कारभार पाहिला जातो. तेथील मूळची 1500 फूट उंचीवरील  टेकडीवरील अर्थात मूळपीठ गडावरील मंदिरांमध्ये यमाईदेवीची साडेसहा फूट उंचीची पूर्वाभिमुखी शांतमुख व तेजस्वी मूर्ती आहे. संपूर्ण दगडी कोरीव बांधकाम असलेल्या  मंदिरातील  कर्‍हाड कमानीस दोन फिरते खांब आहेत. याशिवाय गावात राजवाड्यासमोरील मंदिरात देवीची प्रसन्‍न  मूर्ती आहे. या मंदिरासमोर संपूर्ण राज्यातील सर्वात मोठी दीपमाळ असून  ती शाकंभरी पौर्णिमेस प्रज्वलित करण्यात येते. योगसाधनेतील सुप्रसिद्ध सूर्यनमस्कार व्यायाम प्रकाराचे उगमस्थानही औंध हेच आहे. येथील ज्ञानमंदिरात साने गुरुजी, ग. दि. माडगुळकर, शंतनुराव किर्लोस्कर इत्यादींनी अध्ययन केले आहे. मूळपीठ गडावर जात असताना मध्यावरील पायथ्यावर जगप्रसिद्ध श्री भवानी वस्तूसंग्रहालय आहे. अत्यंत दुर्मिळ चित्रे व अन्य विविध प्रकारच्या कलाकृती वैशिष्ट्यपूर्ण वस्तू पाहण्यासाठी येथे जगभरातून पर्यटक येत असतात.

देवदरीतील तीर्थक्षेत्र श्रीकार्तिक स्वामी (अंभेरी) ः भारतातील अत्यंत दुर्मिळ अशा कार्तिक स्वामींच्या स्थानांपैकी हे एक तीर्थक्षेत्र असून रहिमतपूर-वडूज रस्त्यावर रहिमतपूरपासून सात किलोमीटरवर वृक्षराजीने लपेटलेल्या निसगर्र्रम्य दरीमध्ये कमंडलू  नदीच्या उगमस्थानी असलेल्या या पुरातन मंदिराचा मध्यंतरी जीर्णोद्धार करण्यात आला असून मंदिराच्या अगदी जवळपर्यंत वाहनाने जाता येते.

3) पुसेगाव ः श्री सेवागिरी महाराजांचे संजीवन समाधी असलेले पुसेगाव हे देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून  दरवर्षी मार्गशीर्ष अमावस्येला भरणार्‍या रथोत्सव व यात्रेसाठी संपूर्ण  राज्यभरात प्रसिद्ध आहे. रथावर अर्पण होणार्‍या लाखो रुपयांच्या देणगीतून देवस्थानतर्फे धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. सातारा-पंढरपूर मार्गावर सातार्‍यापासून 38किलोमीटर अंतरावरील या तीर्थक्षेत्री अमावस्या, पौर्णिमा व गुरुवारी भक्‍तांची मोठी गर्दी होत असते.

मायणी  ः- सातारा-सांगली जिल्ह्याच्या संत परंपरेतील महत्त्वाचे स्थान असणारे सद‍्गुरु यशवंतबाबा आणि त्यांच्या मातोश्री सरुताई यांच्या निवासाने प्रसिद्ध असणारे मायणी हे सिद्धनाथ, यशवंतबाबा व सरुताईंच्या वार्षिक रथोत्सव यात्रांसाठी प्रसिद्ध गाव आहे. पुराणकथातील मैनावतीचा संदर्भ असणार्‍या या गावाला चाँद नदीचे सानिध्य असून  येथील पेरु विशेष प्रसिद्ध आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठीही मायणीची अलीकडे चांगलीच ख्याती झाली आहे.