Thu, Apr 25, 2019 14:09होमपेज › Satara › हायवेवर दिसले एसपी आणि ‘मोका’ साधून टाकला ठोका 

हायवेवर दिसले एसपी आणि ‘मोका’ साधून टाकला ठोका 

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 26 2018 11:11PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत शिस्तबद्ध व शांततेत मोर्चा निघाल्यानंतर दुपारी महामार्गावर जमाव अचानक आक्रमक  होऊन आंदोलनाला गालबोट लागले. अचानक हा प्रकार घडल्याने त्याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. अर्थात या जमावालाही धडाडीचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील स्वत: व त्यांची टीम ‘फेस टू फेस’ सामोरी गेली. त्यावेळी जिल्हा पोलिस प्रमुखांवर हल्ला होण्यापर्यंत मजल गेली असून त्यामागे काळंबेरं असल्याचे बोलले जात आहे. आंदोलनात घुसून  हायवेवर दिसलेल्या एस.पींवर ‘मोका’ साधून ठोका टाकण्याचे मोठे षड्यंत्र भिरभिरत येणार्‍या दगडांमधून दिसले आहे. आता पोलिसी कॅमेर्‍याने ‘दूध का दूध, पानी का पानी’ करून आंदोलनाला व सातार्‍यालाही बदनाम करणार्‍यांचा  डाव उधळला आहे. 

जिल्हा पोलिसप्रमुख म्हणून संदीप पाटील यांनी चार्ज घेतल्यानंतर गेल्या दोन वर्षांत त्यांनी ‘एक से एक बढकर एक’ अशा बेधडक कारवाया केल्या आहेत. एसपी संदीप पाटील यांच्या धडाडीच्या कामामुळे त्यांची ओळख ‘मोका फेम’ अशी झालेली आहे. याशिवाय सावकारीचे समूळ उच्चाटन करताना तडीपारीच्या केलेल्या कारवायांसह गल्‍लीबोळातील गुंडांपासून नामचीन गुंडांपर्यंत सार्‍यांच्याच 

मुसक्या त्यांनी आवळल्या आहेत. गेल्या वर्षी सातारा जिल्ह्याने सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्ताने राजधानीत काढलेला मोर्चा अवघ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. संदीप पाटील यांची धडाकेबाज  कार्यपध्दती अवघ्या सातारा जिल्ह्याने पाहिली आहे. त्यामुळे  संदीप पाटील व सर्वसामान्य सातारकर अशी नाळ बनलेली आहे. बुधवारी मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानेही सातारा  पोलिस अलर्ट होते. राजवाडा, पोवई नाका, जिल्हाधिकारी कार्यालयासह शहरातील महत्वाची ठिकाणी व महामार्गावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सकाळपासून प्रत्यक्ष मोर्चेकरी जमल्यानंतरही शांततेचे वातावरण होते. मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर त्याची सांगताही संयमानेच झाली. मोर्चाची सांगताच साडेअकराच्या दरम्यान झाल्याने मोर्चेकरीही शांततेत घरी निघाले होते.  मग महामार्गावर अचानक जमाव प्रक्षुब्ध  का झाला? दगडफेक, पेटवापेटवी व जाळपोळही कशी झाली? या प्रकाराने पोलिसही अवाक झाले. आंदोलन शांततेत झाले असताना अचानक असे कसे घडले? हे कोडे पोलिस अधिकार्‍यांसह अनेकांना पडले. मात्र त्यामागे मोठे षडयंत्र असल्याच्या निष्कषापर्यंत पोलिस आले आहेत.

पोलिस अधीक्षकांनी गेल्या दोन वर्षात ज्या धडाकेबाज कारवाया  केल्या आहेत, त्याला यानिमित्ताने खोडा घालण्याचा प्रयत्न झाला असल्याचा संशय व्यक्‍त होत आहे. सातार्‍यातील या घटनेची कसून चौकशी करुन ताब्यात घेतलेल्या तसेच पोलिसांच्या कॅमेर्‍यात कैद झालेल्या आंदोलकांची माहिती घेवून पोलिसांनी सोक्षमोक्ष लावण्याची गरज निर्माण झाली आहे. 

एस.पी. दिसले आणि दगडांच्या सलग फैरी 

आंदोलकांमधील काहीजण महामार्गावर गेले हेही वास्तव आहे. त्यापैकी काहीजणांनी महामार्ग रोखत टायर पेटवले हेही खरे आहे. मात्र, जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील व मराठा क्रांती मोर्चाची समन्वय समिती महामार्गावर पोहोचली व टायर पेटवणार्‍यांची त्यांनी समजूत काढून त्या गटाला पांगवले तेव्हा अचानक ब्रिजखालून दगडांच्या सलग फैरी कशा सुरू झाल्या? हा मोक्‍का नेमका बॉम्बे रेस्टॉरंटच्या पलीकडच्या दिशेने कोणी साधला? आंदोलक पळत असताना खालून दगडफेक कोण करत होेते? जर ते आंदोलक असतील तर अचानक त्यांना एवढे दगड कसे सापडतील? पोलिस तपासात असे पुढे येत आहेत की रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये दगडांचे हे गोटे एकत्र करून ठेवले होते. म्हणजे आंदोलकांमधील काहीजणांना फूस लावून महामार्गावर दगडफेक करण्याचे नियोजित षड्यंत्र होते. त्यात जिल्हा पोलिस प्रमुखांबद्दल गुन्हेगारांची असलेली चीड ही सलग दगडांच्या फैरींमध्ये दिसून येत होती. दगडफेक करणार्‍यांची कॅमेर्‍याने टिपलेली छबी पाहिल्यानंतर हे फुटकळ कुठले होते? हेही निष्पन्‍न होऊ लागले आहे. जे संदीप पाटलांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणा करत होते तेच शिवीगाळ करून दगडांच्या फैरी झाडत होते. मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आंदोलनात घुसून हा कावा साधला गेला होता.