Sun, May 26, 2019 15:35होमपेज › Satara › रौप्यमहोत्सवी ‘दर्पण’ पुरस्कारांचे महाराष्ट्रदिनी वितरण

रौप्यमहोत्सवी ‘दर्पण’ पुरस्कारांचे महाराष्ट्रदिनी वितरण

Published On: Apr 27 2018 1:09AM | Last Updated: Apr 26 2018 10:54PMफलटण : प्रतिनिधी

मराठी वृत्तपत्र सृष्टीत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या ‘दर्पण’ पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्रदिनी दि. 1 मे रोजी 3.30 वाजता श्रमिक पत्रकार भवन पुणे येथे होत असून या पुरस्कार सोहळ्यात पश्‍चिम महाराष्ट्रातून ‘पुढारी’च्या सातारा आवृत्तीचे वृत्तसंपादक हरीष पाटणे यांच्यासह राज्यभरातील निवडक पत्रकारांचा रौप्यमहोत्सवी ‘दर्पण’ पुरस्काराने देशाचे माजी कृषि मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्‍वजित कदम यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक रवींद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान होणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी दिली.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरु केलेल्या व मराठी वृत्तपत्रसृष्टीत प्रतिष्ठित सन्मानाचे समजल्या गेलेल्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास यावर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत.  

पुरस्कार वितरण सोहळ्यात सातार्‍यातील तीन पत्रकारांचा सन्मान होणार आहे. त्यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातून ‘पुढारी’च्या सातारा आवृत्तीचे वृत्तसंपादक हरीष पाटणे यांना ‘दर्पण’ पुरस्कार तर ऐक्यचे कार्यकारी संपादक वासुदेव कुलकर्णी यांना ज्येष्ठ संपादक दर्पण पुरस्कार तर ऐक्यचेच वाई प्रतिनिधी दत्ता मर्ढेकर यांना विशेष दर्पण पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय स्तंभलेखक भाऊ तोरसेकर (मुंबई), वसंत भोसले (कोल्हापूर), सुकृत खांडेकर (मुंबई), विजय बावीस्कर (पुणे), सुधीर भोंगळे (मुंबई), यदू जोशी (मुंबई) यांना पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल ‘दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. 

अन्य ‘दर्पण’ पुरस्कारार्थी याप्रमाणे  ‘दर्पण’ पुरस्कार मराठवाडा विभाग - प्रद्युम्न गिरीकर (हिंगोली), विदर्भ विभाग - प्रशांत देशमुख (वर्धा),कोकण विभाग - उत्तम वाडकर (सावंतवाडी), उत्तर महाराष्ट्र विभाग - अनंत पाटील (अहमदनगर), बृहन्महाराष्ट्र विभाग - भालचंद्र शिंदे (कलबुर्गी, जि.गुलबर्गा). बृहन्महाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ पुरस्कृत पत्रमहर्षि वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक पुरस्कार - डॉ.जगदीश कदम, विशेष दर्पण पुरस्कार - भाऊसाहेब कदम (कोल्हापूर),  प्रताप महाडिक (कडेगाव, जि.सांगली), संपत मोरे (पुणे), ज्येष्ठ पत्रकार शंकर पाटील पुरस्कृत साहस  पत्रकारिता ‘दर्पण’ पुरस्कार - संतोष पवार (माथेरान, जि. रायगड) यांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.  ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पहिले स्मारक त्यांच्या जन्मगावी पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधूदुर्ग येथे 1993 साली संस्थेच्या माध्यमातून रविंद्र बेडकिहाळ यांच्या अथक परिश्रमातून व पोंभुर्ले, देऊळवाडी ग्रामस्थ, जांभेकर कुटुंबीय यांच्या सहकार्याने उभे राहिले आहे. यासह विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमही संस्थेद्वारे राबविले जातात अशी माहितीही यावेळी देण्यात आली. 

मराठी पत्रकारितेतील  अतिउच्च मानबिंदू ठरलेल्या या पुरस्कार सोहळ्यास सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, वृत्तपत्रप्रेमी, हितचिंतक, पत्रकार यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, भारती विद्यापीठाचे सहाकार्यवाह डॉ.एम.एस.सगरे यांनी केले आहे.