Tue, Apr 23, 2019 23:41होमपेज › Satara › प्रतापसिंह महाराजांचे कार्य समाजहितौषी 

प्रतापसिंह महाराजांचे कार्य समाजहितौषी 

Published On: Jan 19 2018 1:58AM | Last Updated: Jan 18 2018 10:22PMसातारा : प्रतिनिधी

स्वातंत्र्यपूर्व काळात थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी शाळा, राजवाडे बांधले. त्यांनी सुरु केलेल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांनी त्या काळात अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. प्रतापसिंह महाराजांचे कार्य समाजहितौषी होते, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

सातारा नगरपालिकेच्यावतीने श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांची 225 वी जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्‍त दरवर्षी दिला जाणार्‍या श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीसेवा पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उद्योजक फारुख कूपर, होमाई कूपर, गुरुवर्य संभाजीराव पाटणे, उपनगराध्यक्ष राजू भोसले, मनिषा कूपर, साविआ गटनेत्या स्मिता घोडके प्रमुख उपस्थित होते. 

खा. उदयनराजे भोसले म्हणाले,  थोरल्या प्रतापसिंह महाराजांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. सातारच्या सर्वांगिण विकासाचे ते शिल्पकार होते. त्यांनी सर्वसामान्यांच्या हिताची कामे केली. स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदलली. राजघराण्याच्या इस्टेटी जप्‍त झाल्या. आजोबांच्या निधनानंतर राजघराण्याने मोठा संघर्ष केला. आता परिस्थिती बदलली. ‘या कार्यक्रमास डॅडी हवे होते,’ असे सांगताना खा. उदयनराजेंच्या वडिलांबद्दल आठवणी दाटून आल्या.

सौ. माधवी कदम म्हणाल्या, श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) हे प्रजाहितदक्ष राजे होते. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. बहुआयामी राजे असल्याने त्यांचे कार्य वंदनीय आहे. दरम्यान, श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले. फरोख कूपर यांना पुरस्कार देवून त्यांचा सपत्निक गौरव करण्यात आला. 

प्रास्तविक शिरीष चिटणीस यांनी केले. गुरुवर्य संभाजीराव पाटणे यांनी पुरस्काराबद्दल भूमिका विशद केली. सूत्रसंचलन नगरसेविका सविता फाळके यांनी केले. राजू भोसले यांनी आभार मानले, कार्यक्रमास पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, शहर नियोजन सभापती स्नेहा नलवडे, आरोग्य सभापती यशोधन नारकर, महिला व बालकल्याण समिती सभापती अनिता घोरपडे, नगरसेविका सुजाता राजेमहाडिक, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.