होमपेज › Satara › पोलिसांशी वाद घालताय..  सावधान! 

पोलिसांशी वाद घालताय..  सावधान! 

Published On: Dec 23 2017 2:12AM | Last Updated: Dec 22 2017 11:46PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

वाहतूक शाखेच्या पोलिसांशी वाद घात असाल तर सावधान... कारण, यापुढे पोलिसांकडे बटनस्पाय (लहान छुपे) कॅमेरा असणार आहेत. शर्टच्या मधल्या बटणमध्ये तो लावण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांबरोबर होणारे वादावादीचे प्रसंग व संभाषणावर पोलिसांचा हा तिसरा डोळा लक्ष ठेवणार आहे. कराडमध्ये याची प्रयोगिक तत्त्वावर अंमलबजावणी होणार आहे.  

वाहतूक शाखेच्या पोलिसांशी नेहमीच वादावादीचे प्रकार घडत आहेत. वाहनधारक व पोलिस कर्मचारी आपआपली बाजू मांडत असतात. यामध्ये अनेकवेळा चूक कोणाची, हा प्रश्‍न नेहमीच अनुत्तरित राहतो. नेमकं कोण काय बोललं, हे घटनेनंतर अनेकवेळा स्पष्ट होत नाही. त्यावर पर्याय म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचार्‍यांना बटणस्पाय कॅमेरा देण्यात येणार आहे. या कॅमेर्‍याद्वारे पोलिस कर्मचारी ड्युटी बजावत असताना ज्या ठिकाणी जाईल तेथील चित्रफीत तयार होणार असून, संभाषणही रेकॉर्ड होणार आहे. यामुळे नेमकी चूक लक्षात येणार असून वाहनधारक व पोलिस कर्मचारी यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग कमी होणार आहेत.  

वाहतूक शाखेचेपोलिस कर्मचारी उद्धट व उर्मट वागतात असा आरोप अनेकवेळा वाहनधारक किंवा ज्यावर कारवाई झाली अशा नागरिकांकडून होत असतो. काहीवेळा पोलिस कारवाईपासून किंवा होणार्‍या दंडात्मक कारवाईतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी माझी काहीही चुक नाही पोलिसांनीच माझ्याशी हुज्जत घातल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नेहमी पोलिसांचीच चुक असते, अशी परिस्थिती निर्माण केली जाते. काही दिवसापुर्वी शहरातील दत्त चौकात दोन युवकांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली होती. तसेच ड्युटी बजावत असताना दिवसातून एकवेळ तरी पोलिसांशी वादावादीचा प्रकार घडत असतो. 

याचा विचार करून रोजच्या वादावादीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी डीवायएसपी नवनाथ ढवळे यांच्या सुचनेनुसार पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यातील वाहतूक पोलिसांसाठी हायटेक यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पोलिस कर्मचार्‍यांना बटणस्पाय कॅमेरे देण्यात आले आहेत. त्या कॅमेर्‍याव्दारे वाहनधारकाने वाद घातला की कर्मचारी उद्धट बोलला, हे पुराव्यानिशी समोर येणार आहे.