Sat, Jun 06, 2020 00:25होमपेज › Satara › अपंग प्रकाश पाटोळे यांच्या वेदनादायी आयुष्याची चित्तरकथा

जन्म जाळण्या दुःख दिले ..!

Published On: Apr 24 2019 1:42AM | Last Updated: Apr 23 2019 11:34PM
कराड : अशोक मोहने 

भीक मागण्या भूक दिली
जन्म जाळण्या दुःख दिले,  पांघराया न्हाय दिलं..
अंथराया काय दिलं?

अशी अवस्था उतार वयात मरण यातना भोगणारे प्रकाश पाटोळे व त्यांच्या पत्नी सुलभा पाटोळे यांच्या वाट्याला आली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून पाटोळे पती -पत्नी येथील कॉटेल हॉस्पिटलच्या समोरील फुटपाथवर भीक मागून दिवस काढत आहेत. यात भर म्हणून प्रकाश पाटोळे यांच्या उजव्या पायाला अपंगत्व आले आहे. चालता येत नसल्याने दिवसभर त्यांचा प्रवास तीन चाकी सायकलवरून सुरू असतो. यातच मध्यंतरी त्यांच्या सायकलला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने त्यांचा हातही कोपरापासून दुखावला आहे. शहरात फिरून भीक मागून हे दाम्पत्य जीवन जगत आहे. 

पाटोळे यांचे मुळ गाव कराड तालुक्यातील शामगाव. वडिलोपार्जित घर होते, जमीन होती तेही परिस्थितीमुळे राहिले नाही. तीन मुलींची लग्न झाली आहेत. पण जावयाच्या घरी या अवस्थेत कसे रहायचे म्हणून ते कराड शहरात फुटपाथवर जीवन कंठत आहेत.  रहायला घर नाही,  पोटाला जमीन नाही. गाव नावापुरते राहिले आहे. पंधरा दिवसात, महिन्यात कधी तरी ते गावी जातात. तेथेच शाळेच्या आवारात किंवा पत्र्याच्या शेडमध्ये रात्र काढतात. 

कोणी नाही म्हणून लोक दोन वेळचे जेवण देतात. कधी कधी शिळे जेवणही वाट्याला येते. पण दुःखच येवढे मोठे आहे याची सवयच त्यांना झाली आहे. दुसर्‍या दिवशी अ‍ॅपेरिक्षाचालक कराडला आणून सोडतो. 

दिवसभर फिरून रात्री निवार्‍याला पाटोळे दाम्पत्य कॉटेज हॉस्पिटलच्या समोर फुटपाथवर येतात. तेथेच झाडाखाली झोपतात. हिवाळा, पावसाळा त्यांच्या मुक्काम त्याचठिकाणी आहे. पाऊस लागून राहिला तर कोणाच्या तरी दुकानाच्या ओसरीला जाऊन झोपतात. म्हातारपणातील यातना आणि अपंगत्वाच्या वेदना हेच त्यांचे सोबती.

त्यांच्या पडत्या काळात त्यांच्या सोबत सावलीप्रमाणे राहणारी  वृध्द पत्नी सुलभा यांच्याही आयुष्याची परवड भयंंकरच आहे. 

त्यांना हक्काचा निवारा मिळेल..?

प्रकाश पाटोळे व सुलभा पाटोळे यांच गाव शामगाव असले तरी गावी त्यांच हक्काचं असं काहीच उरलेल नाही. मतदान कार्ड, रेशन कार्ड आहे पण हक्काच घर नाही.ज्यांना घर नाही,घरासाठी जागा नाही त्यांना शासन जागेसकट घरकुल योजनेचा लाभ देते. हे निराधार दाम्पत्य या योजनेस पात्र असतानाही त्यांना याचा लाभ मिळत नाही. त्यांना गावात हक्काचा निवारा मिळवून देणारे ग्रामपंचायत प्रशासनही  याबाबत उदासिन आहे.