Sat, Jun 06, 2020 01:42होमपेज › Satara › तुम्हाला पण ‘त्यांनीच’ पगडी घातली का?

तुम्हाला पण ‘त्यांनीच’ पगडी घातली का?

Published On: Sep 23 2019 1:58AM | Last Updated: Sep 22 2019 10:48PM
सातारा : प्रतिनिधी

शरद पवार भाषणाला उभे राहताच डायस जवळच शिंग फुंकण्यात आले. शिंग फुंकणार्‍याच्या डोक्यावर पगडी होती. पवार यांनी पगडीला हात लावून चाचपले. त्यावेळी उपस्थितांमधून एकच जल्‍लोष झाला. पवारांची कृतीच एवढी विलक्षण होती की त्यांच्या देहबोलीतून तमाम जनसागराला जे समजायचे होते ते समजले होते. शिंगवाल्याला काय झाले ते समजले नाही. तो खाली बसला. मात्र, पवारांनी त्याला पुन्हा उभे रहायला सांगितले.

पुन्हा त्याच्या पगडीला हात लावला  आणि समुदायाला उद्देशून शरद पवार म्हणाले, ‘मी  यांना विचारत होतो. गेल्या आठवड्यात टेलीव्हिजनवर पाहिलं, दिल्लीमध्ये कोण तरी कुणाला पगडी घालत होता, तुम्हाला पण त्यांनीच पगडी घातली का?  पवारांच्या या शेलक्या टोमण्यावर टाळ्या-शिट्ट्यांचा एवढा गजर सुरु होता की पवारांना भाषण सुरुच करता आले नाही. उदयनराजे यांनी भाजप प्रवेशानंतर केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व त्यानंतर नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  पगड्या  घातल्या होत्या. त्याचाच संदर्भ पवारांच्या कृतीत व  बोलण्यात दिसला.

पवारांनी आपल्या छोट्याशा कृतीने उदयनराजेंच्या कृत्यावर वर्मी घाव घातला. लोकसभा निवडणुकीच्या प्रारंभप्रसंगी शरद पवारांनी उदयनराजेंची कॉलर उडवून स्टाईल केली होती. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या शुभारंभाला त्याच पवारांनी पगडीला हात लावून त्यावेळच्या स्टाईलला अनोखे उत्तर दिले. त्यांची ही कृती म्हणजे उदयनराजेंच्या कॉलरलाच हात असल्याची चर्चा आहे.