Tue, Jun 02, 2020 00:13
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › पीक विम्याचे पैसे मिळाले का? दुष्काळी अनुदान मिळाले का?

पीक विम्याचे पैसे मिळाले का? दुष्काळी अनुदान मिळाले का?

Last Updated: Nov 16 2019 2:01AM
खटाव : प्रतिनिधी 

नुकसानीचा आढावा घेऊन दोन दिवसात राज्यपालांना भेटणार आहे.  विधानसभेपूर्वी दुष्काळ अनुदान मिळाले का?,  पिक विमा मिळाला का?, चारा छावण्या अनुदान मिळाले का? असे सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. वरिष्ठ स्तरावरून पैसे न मिळाल्याने आम्हाला देता येत नसल्याची खंत अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी जे शक्य आहे ते मी करणार आहे, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.

काटेवाडी, ता. खटाव येथे ठाकरे यांनी  पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे,  नितीन बानगुडे-पाटील, शिवसेना सचिव विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, आ. महेश शिंदे, शेखर गोरे, चंद्रकांत जाधव, नरेंद्र पाटील, भानुदास कोरडे, प्रताप जाधव, विजय शिवतारे उपस्थित होते.

उध्दव ठाकरे म्हणाले, घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्येसारखा चुकीचा विचार केला तर संपूर्ण घरच उघड्यावर येणार आहे. या आस्मानी संकटात मी आणि शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. अवकाळी पावसामुळे शेतात कुजलेली पिके काढून पुढील रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना तयारी करावी लागणार आहे. प्रत्येक शेतकर्‍याचे  लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई तर मिळालीच पाहिजे. जगाच्या पोशिंद्याला मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. दरम्यान, काटेवाडीत उध्दव ठाकरेंनी शेतकर्‍यांना पिकविम्याचे पैसे मिळाले का?, दुष्काळ अनुदान मिळाले का?, पंतप्रधान योजनेचे सहा हजार रुपये मिळाले का?, असे प्रश्न विचारले. शेतकर्‍यांनी यापैकी काहीच मिळाले नसल्याचे त्यांना सांगितले. खरे तर विधानसभा निवडणुकीपूर्वी हे सगळे पैसे शेतकर्‍यांना मिळायला हवे होते. आताही कोणता निकष, नियम आणि अटी न लावता शेतकर्‍यांना तातडीची मदत मिळावी, असे  सांगत उध्दव ठाकरे यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

निवेदनांचा पाऊस...
उध्दव ठाकरे यांच्या खटाव तालुक्यातील दौर्‍यात मायणी, कातरखटाव, वाकेश्वर, खातगुण, पुसेगाव येथे शेतकरी, विविध सामाजिक, राजकीय संघटनांकडून नुकसानभरपाई मिळण्याबाबतची निवेदने देण्यात आली. आ. महेश शिंदे यांच्या खटाव येथील निवासस्थानी तर उध्दव ठाकरे यांना शेकडो शेतकरी आणि संघटनांनी निवेदने देवून नुकसानभरपाईची मागणी केली. आ. महेश शिंदे यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती उध्दव ठाकरे यांना दिली.

आत्महत्या नको, रडायचं नाही आता लढायचं 
कातरखटाव : वार्ताहर : परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठीच मी बाहेर पडलो आहे. संकट ओढावले आहे पण त्यावर आपल्याला मात करायची आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आत्महत्यासारखे विचार मनात आणू नये. आपल्याला रडायचं नाही तर लढायचं आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना धीर दिला.  कातरखटाव येथील देवापूर वस्तीवरील दिगंबर बागल यांच्या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी शिवसेना प्रवक्त्या नीलम गोर्‍हे, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, आ. महेश शिंदे, शेखर गोरे, विजय शिवतारे, यांच्यासह  पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, मी शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठीच आलो आहे. शेतकर्‍यांच्या खात्यावर सरसकट प्रारंभी सुमारे 25 हजार रुपये देण्याची मानसिकता आम्ही केली आहे. शेतकर्‍यांनी आपल्या कुटूंबाकडे पूर्ण लक्ष देऊन कोणताही मनात अविचार न आणता प्राप्त परिस्थितीवर मात करून उर्वरित आयुष्य जगणे गरजेचे आहे. सत्ता स्थापना होईल तेव्हा होईल तोपर्यंत शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, या हेतूने  मी शेतकर्‍यांसाठी आलो आहे. ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे ती शेती सुस्थितीत करण्यासाठी मनरेगा मार्फत प्रशासनाकडून काम करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.  याप्रसंगी विविध शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा लेखी स्वरुपात उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडल्या. त्यावर उद्धव ठाकरे यांनी याबाबत ठोस कार्यवलाही होईल, असे आश्वासनही दिले. दरम्यान खटाव येथेही त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधून आधार दिला.