Fri, Jul 19, 2019 01:07होमपेज › Satara › वटपौर्णिमेसाठी जाताना  7 तोळ्यांचे गंठण लंपास

वटपौर्णिमेसाठी जाताना  7 तोळ्यांचे गंठण लंपास

Published On: Jun 28 2018 1:41AM | Last Updated: Jun 27 2018 11:03PMसातारा : प्रतिनिधी

शाहूपुरीतील एलआयसी कॉलनीत बुधवारी सकाळी महिलेच्या गळ्यातील तब्बल 7 तोळ्यांचे 1 लाख 45 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या गंठणावर धूमस्टाईलने आलेल्या दोघांनी डल्‍ला मारला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संतापाची लाट उसळली आहे.

सोनाली विजय शिंदे (वय 45, सध्या रा. एलआयसी कॉलनी मूळ रा. किन्हई ता. कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. वटपौर्णिमा असल्याने सकाळपासून महिलांची वडाच्या झाडाला पूजण्यासाठी व दर्शनाला जाण्यासाठी गडबड सुरू होती.  सोनाली शिंदे या किन्हईच्या असल्याने त्या गावी निघाल्या होत्या. घरातील आवरल्यानंतर गेटजवळ दुचाकी आणली. दुचाकीवर बसताच समोरुन दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले. संबंधित महिलेने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र धूम स्टाईलने चोरटे पसार झाले.

महिलेने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. गंठण हिसकावल्याचे सांगितल्यानंतर चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला. मात्र चोरटे दुचाकीवरुन गायब झाले होते. या घटनेनंतर शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. संशयितांचे वर्णन घेवून तत्काळ नाकाबंदी करण्यात आली.