Wed, Nov 14, 2018 21:45होमपेज › Satara › चोरटे कोट्यधीश बनले की हो..!

चोरटे कोट्यधीश बनले की हो..!

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 8:55PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

धूमस्टाईल चोरटे आता कोट्यधीश बनले असून त्यांची जणू काय अब्जाधिशाकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे उपरोधिकपणे बोलले जात आहे. दररोज कुठे ना कुठे सुवर्णालंकार लंपास होऊ लागले आहेत. त्यामुळे या चोरट्यांचा बारमाहीच दिवाळी-दसरा सुरू आहे. शहरापुरती मर्यादित असणारी धूम स्टाईल गुन्हेगारी आता ग्रामीण भागातही फोफावली असल्याने महिलांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.

सातार्‍यासह अवघ्या जिल्ह्यात चोरट्यांचा उच्छाद आहे. कुठे ना कुठे घरफोडी, लुटालूट सुरू असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. हे कमी की काय म्हणून आता धूम स्टाईल चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडेही वळवला आहे. सातार्‍यात तर एखादा दिवस अपवादात्मक गेल्यानंतर धूम स्टाईल चोरीच्या घटना सातत्याने घडतच आहेत. दररोज सोन्याची लयलूट सुरू आहे.

एकटी-दुकटी महिला दिसली की तिच्या गळ्यातील सोन्याचा हार डोळ्याचे पाते लवते न लवते तोच लंपास होत आहे. एखाद्या सराफाकडे नसतील एवढे सोने या धूम स्टाईल चोरट्यांनी लुटले आहे. त्यामुळे हे चोरटे खरोखरच कोट्यधीश झाले की काय? असेही उपरोधिकपणे बोलले जात आहे. पोलिसांकडून त्यांच्यावर जरब बसवण्याचा प्रयत्न होत असला तरी या चोर्‍या थांबलेल्या नाहीत.

शहरामध्ये रस्त्यावरून चालणार्‍या माणसांचे तसेच महिलांच्या गळ्यातील दागिने चालत्या   मोटारसायकलींवरून ओढून नेण्याचे प्रकार बर्‍याच प्रमाणात  वाढले  आहेत. तसेच अंगावर घाण टाकून जवळील पैशाची बॅग दिशाभूल करून पळवून नेण्याचे प्रकारदेखील बर्‍याच प्रमाणात वाढले होते. तसेच दागिने पॉलिश करून देण्याच्या नावाखालीदेखील शहरी महिलांची फसवणूक केली जात आहे.

सध्या ग्रामीण भागामध्ये थंडीची सुरूवात झाली आहे. तसेच सर्वत्र सुगीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे बराच उशीरापर्यंत ग्रामीण भागातील लोक शेतामध्ये थांबत असतात. शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीची वेळ बर्‍याच ठिकाणी सोईस्कर वाटत आहे. त्यामुळे बरेच शेतकरी रात्री आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी शेतीवर थांबतात. याचाच फायदा घेऊन भुरटे तसेच मोठे चोर गावामध्ये चोर्‍या करतात.

तसेच रात्री-अपरात्री रस्त्यांवरून येणार्‍या लोकांना वाटेमध्ये अडवून लुटमार केली जाते. अशा स्वरूपाचे प्रकार याआधी बर्‍याच ठिकाणी घडले आहेत. तसेच रात्री शेतीला पाणी पाजण्यासाठी गेलेल्यांनादेखील चोरांनी लुटले आहे. तसेच विहिरी, ओढे, नाले यावर असणार्‍या वीज पंपांची चोर्‍या तर दररोज सुरूच आहेत. त्यामुळे जनतेमध्ये घबराट आहे.