Fri, Jun 05, 2020 10:36होमपेज › Satara › धोमची प्रवासी जलवाहतूक आता कायमची बंद

धोमची प्रवासी जलवाहतूक आता कायमची बंद

Published On: Nov 17 2018 1:23AM | Last Updated: Nov 16 2018 10:45PMओझर्डे : दौलतराव पिसाळ 

धोम जलाशयातील प्रवासी वाहतूक करणारी मोटर लाँच सेवा आता कायमची बंद होणार आहे.  जिल्हा परिषदेच्या एका प्रमुख पदाधिकार्‍याच्या हट्टापायी ही जलवाहतूक इतिहासजमा होत असून  ही मोटर लाँच आता तापोळ्याकडे नेण्याचा घाट घातला आहे. याबाबतचा लेखी आदेश गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आल्यामुळे वाईच्या पश्‍चिम भागात संतापाची लाट उसळली आहे.

वाई तालुक्याचा पश्चिम भाग हा 40 गावे व अनेक वाड्या-वस्त्या असणारा हा परिसर भौगोलिक द‍ृष्टया डोंगराळ व दर्‍या-खोर्‍यांचा आहे.    निसर्गसौंदर्याने  नटलेल्या या परिसराला धोम धरणामुळे आणखी चार चाँद लागले आहेत.  पर्यटकांनाही हा परिसर खुणावत असतो.  वाईच्या पश्‍चिमेकडील या दुर्गम भागातील   गावे वाहतुकीसाठी फक्त कागदावरच एसटी महामंडळाशी जोडली गेली  आहेत. प्रत्यक्षात एस.टी. सेवेबाबतच्या तक्रारी व दुर्गम भागामुळे दळणवळणाच्या येणार्‍या अडचणी यावर उपाय म्हणून35 वर्षापूर्वी धोम धरणाच्या दुतर्फा असणार्‍या गावांसाठी धरणात मोटर लाँचद्वारे प्रवासी वाहतुकीचा श्रीगणेशा करण्यात आला.  

1978 पासून ही सेवा सुरू झाली. मोठयांसाठी 10 रुपये व लहानासाठी 5 रुपये असे या जलवाहतुकीचे दर निश्‍चित करण्यात आले. या जलवाहतुकीद्वारे सुमारे 30 कि.मी. वळसा घालून कापावे लागणारे अंतर अवघ्या 10 मिनिटावर आले.  त्यामुळे गावे जवळ येवून लोकसंपर्कही वाढला. नागरिकांना आर्थिकद‍ृष्ट्याही ते परवडणारे ठरले. ही लाँच सेवा 24 तास उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना दळणवळणाची चांगली सोय झाली होती. मात्र, का कुणास ठावूक या लाँच सेवेला कुणाची तरी द‍ृष्ट लागली. सन 2016 मध्ये जिल्हा परिषदेच्या एका प्रमुख पदाधिकार्‍याच्या हट्टापायी ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे लेखी आदेश वाईच्या बीडीओंना देण्यात आले. त्यानंतर या लाँच सेवेला घरघर लागली. कधी बंद तर कधी चालू अशा अवस्थेत ही सेवा येवून नागरिकही त्याकडे पाठ फिरवू लागले. बेभरवशी सेवा करून जाणीवपूर्वक लाँच बंदच राहण्यासाठी वातावरण निर्मिती केली गेली. आता तीन महिन्यांपूर्वी ही लाँच तातडीने तापोळा येथे पाठवण्याचे आदेशही जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे वाईच्या पश्‍चिम भागात संतापाची लाट उसळली आहे.

डोंगराळ भागातील जनतेची सोय पहा...

धोम जलाशयातील प्रवासी मोटर लाँच वाईच्या पश्‍चिमेकडील नागरिकांसाठी सोयीची होती. मात्र, अनेक अडचणी निर्माण करून ही सेवा बंद करण्यास भाग पाडले गेले. वास्तविक यामध्ये राजकारण न येता स्थानिक जनतेची सोय पाहणे महत्वाचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी दुर्गम व डोंगराळ भागातील जनतेसाठी ही लाँच सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.