Tue, Jul 23, 2019 10:31होमपेज › Satara › ढेबेवाडी विभाग वन्य प्राण्यांच्या दहशतीत

ढेबेवाडी विभाग वन्य प्राण्यांच्या दहशतीत

Published On: Jan 23 2018 1:12AM | Last Updated: Jan 22 2018 8:32PMढेबेवाडी : विठ्ठल चव्हाण

निवी आणि कसणी व घोटील,निगडे या पठारावरील गावांसह परिसरातील पन्नासभरापेक्षा जास्त पाळीव प्राण्यांचा फडशा पाडलेल्या  नर, मादी बिबट्या व त्यांच्या बछड्यांचे वाल्मिक पठारावरील जनतेसह ढेबेवाडी विभागातल्या अनेक गावातल्या ग्रामस्थांना वरचेवर दर्शन होत आहे, नाही म्हटले तरी याची जनतेत एकप्रकारे भीती आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावेच पण त्याचवेळी माणसांना सतत भीतीच्या छायेत वावरावे लागू नये, एवढी माफक अपेक्षा वन्यजीव संरक्षण विभागाकडून आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे कोअर झोन व बफर झोन अशा दोन विभागात कागदोपत्री विभाजन झाले, त्यात बफर झोनमध्ये मोठ्या संख्येने गावे आहेत, कोअर झोन मधल्या काही अपवाद वगळता सर्व गावांचे पुनर्वसन झाल्याचे सांगितले जाते. बफर झोन मधल्या गावांना सेवा सुविधा पुरविण्याचा शासनाचा प्रयत्न आहेच पण वन्य आणि हिंस्र प्राण्यांचा मानवी वसाहतीत प्रवेश व पाळीव प्राण्यावरील हल्ले आणि आणि त्यात ते ठार होण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे याचा बंदोबस्त करायचा कसा ? याचे उत्तर वन्यजीव कडे नाही आणि कायद्याचा किस काढून मिळणारी  तुटपुंजी अत्यल्प मदत हा त्यावरचा इलाज नाही.

या प्राण्यांची अन्न साखळी खंडीत झाली आहे व त्याला माणसांचा सहभाग व हरिण, ससे, डुकरे, कोल्हे व तत्सम प्राण्यांच्या होणार्‍या शिकारी कांही प्रमाणात जबाबदार आहेत आणि वनविभागाचे तिकडे कानाडोळा वा दुर्लक्ष ही कारणीभूत आहे. यापूर्वी वन विभागाच्या अधिकारी वा कर्मचार्‍यांचा सहभाग शिकारीत असायचा हा इतिहास आहे, आता सहभाग नसला तरी दुर्लक्ष वा गस्त व टेहेळणी बाबतचा आळस व बेजबाबदारपणा कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही.

या वन्य प्राण्यांच्या अन्नसाखळीतले अडथळे व कमतरता दूर करण्यावर वन्यजीव विभागाला लक्ष द्यावे लागेल. शिकारी होणार नाहीत इकडे लक्ष द्यावे लागेल, हरणे, भेकरे, डुकरे, ससे, माकडे, वानरे यांची संख्या वाढवण्याकडे, वनराई नष्ट होणार नाही यासाठी लाकुड व्यापार्‍यांबरोबरच्या मैत्रीचा फेरविचार करावा वन विभागाच्या जंगला बरोबरच खासगी वृक्षतोडीवर बंदी करावी लागेल, वन्य प्राण्यांच्या हल्यात ठार झालेल्या जनावरांना मिळणार्‍या मोबदल्यात वाढ अशा उपाययोजनांवर लक्ष द्यावे लागेल, स्थानिक जनतेला विश्‍वासात घेऊन त्यांचे प्रशिक्षण व मतपरिवर्तन करावे लागेल तरच या व्याघ्र प्रकल्पाला उद्दीष्टा पर्यंत जाता येईल.