Tue, Apr 23, 2019 23:44होमपेज › Satara › धावलीसह अनेक गावे भीतीच्या छायेत

धावलीसह अनेक गावे भीतीच्या छायेत

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 11:09PMसातारा : प्रतिनिधी

कास पठारापासून अवघ्या सहा किमीवर डोंगराच्या कुशीत धावली हे गाव वसले आहे. या गावाच्या डोंगरालगत असलेली सुमारे 16 कुटुंबे भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत. डोंगराच्या कुशीत विसावलेल्या येथील घरांवर अनेकदा छोटे-मोठे दगड कोसळत आहेत. काही मोठे दगड उघडे पडले असून केव्हाही गावावर येऊ शकतात. त्यामुळे  येथे ‘माळीण’सारखी घटना घडण्याचा धोका असून अनेक कुटुंबांनी त्या भीतीपोटी स्थलांतर केले आहे. 

गेल्या महिनाभरापासून सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडे सोसाटयाच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस पडत असून धावली गावाच्या परिसरात अनेक ठिकाणी झाडे, दरडी कोसळत आहेत. गावात अनेक विजेचे पोल उन्मळून पडले आहेत. गावाला येणारा रस्ता डोंगरातून येत असून दरवर्षी त्या रस्त्यावर छोट्या मोठ्या दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असते मात्र गावकरी लोकांच्या श्रमदानाने रस्त्याचे पाणी वळवून लावावे लागते. रस्त्यात आलेल्या दरडी बाजूला कराव्या लागतात. रस्ता असला तर लोकांच्या दळणवळणाची व्यवस्था होते. शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता ही कामे श्रमदानाने गाव करतो. पण जी कामे श्रमदानाने होऊ शकत नाहीत ती तरी कामे शासनाने करून देणे अपेक्षित आहे. 

रात्री-अपरात्री आवाज झाला की धावलीतील कुटुंबांच्या ह्रदयात धडकी भरते. एखादा भला मोठा दगड तर त्यांच्या घरावर येत नाही ना, अशा भीतीच्या छायेखाली ते वावरत आहेत. धुवाँधार पावसात जमिनीची झीज होते म्हणजेच माती वाहून जाते. जमिनीला भेगा पडतात, झाडे पडतात. अशावेळी हे भले मोठे दगड कोणत्याही क्षणी या सोळा कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त करू शकतात. त्यात जीवीतहानी देखील होवू शकते. माळीण गाव लुप्त झाले तसे जमिनीच्या उदरात धावली गावातील वरचे आवाड लुप्त होते कि काय? अशी भीती या कुटुंबाना वाटत आहे. 

दरम्यान, सातारा तालुक्यातील रायघर, काळोशी, जकातवाडी या तीन गावांना भुस्खलनाचा धोका असल्याचा अहवाल  तहसीलदार यांनी पाहणी करून जिल्हाधिकारी यांना दिला होता. मात्र, या सर्व्हेतून तांबी, धावली, आलवडी या डोंगरातच वसलेली अनेक गावे राहून गेल्याचे समोर आले आहे. या गावांनी किती दिवस भयग्रस्त अवस्थेत रहायचे? शासनाने निर्णय घेऊन उचित पावले उचलली पाहिजेत नाहीतर माळीण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अहलवालात 49 गावे धोकादायक

माळीण दुर्घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील धोकादायक गावांचा अहवाल सादर करण्याचे आदेश तत्कालिन जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदार यांना दिले होते. या आदेशानुसार तहसिलदारांनी पाहणी केली असता 49 गावे धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. त्यात पाटण तालुक्यातील अनेक गावांचा समावेश होता.

परिस्थिती आता भयावह

एक एक दगड डोंगरावरून सुटुन धावली गावच्या वरच्या आवाडातील घरांच्या भींतींवर आदळत आहेत. दगड मोठे नसल्याने घरांना भेगा पडण्यापलीकडे मोठी हानी झाली नाही. पण आता परिस्थिती तशी नाही. अवाढव्य दगड घसरला तर घरांचा वेध घेणार हे नक्की. सोळा कुटुंबे भयग्रस्त आहेत. भीतीपोटी काहीजण घर सोडून मुंबईला मुलांकडे रहायला गेले आहेत.