Wed, May 22, 2019 16:54होमपेज › Satara › आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘यळकोट’  

आरक्षणासाठी धनगर समाजाचा ‘यळकोट’  

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 11:03PMकराड : प्रतिनिधी  

धनगर समाजाला देण्यात आलेल्या एसटी आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीसह अन्य मागण्यांसाठी  धनगर समाजाच्यावतीने कराड तहसील कार्यालयावर मंगळवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर नाक्यापासून मोर्चास सुरुवात झाली. यळकोट यळकोट  जय मल्हार,  धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. सहा हजारहून अधिक लोक मोर्चात सहभागी झाले होते.

ढोल ताशांचा गजर, गजीनृत्य, मी धनगर असा नामोल्लेख असणार्‍या पिवळ्या टोप्या, झेंडे घेऊन धनगर समाज बांधव  मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणिय होता. धनगरी नृत्याने मोर्चा लक्षवेधी ठरला. सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात द्यावे, शासकीय गायरानातील भूखंड मेंढपाळांना देण्यात यावेत, शेळ्या मेंढ्यांच्या व्यवसायासाठी युवकांना भरीव अनुदान देण्यात यावे, धनगर समाजाच्या मुला, मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात वसतिगृह उभारावे, एसटीच्या सवलती मिळाव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

सकाळी अकरापासूनच धनगर समाज बांधव कोल्हापूर नाक्यावर म.गांधी यांच्या पुतळ्या शेजारी जमा होवू लागले. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू झाली. गावागावातून वाहने घेवून धनगर समाजाचे युवक, महिला, वयोवृध्द मंडळी जमा होत होते. गर्दी जस जसी वाढत होती तस तसा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. पिवळा झब्बा, पिवळ्या टोप्या, पिवळे झेंडे वाढत गेले. धनगरी ढोल वाजू लागले तसे समाज बांधव या ठेक्यावर ताल धरून नाचू लागले. यळकोट यळकोट जय मल्हारचा नारा घुमू लागला. गजी नृत्य सुरू झाले. आरक्षण व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. 

दुपारी एकच्या सुमारास मोर्चास सुरूवात झाली. ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण काकडे, मुंढेचे सरपंच रमेश लवटे, बाजार समितीचे संचालक संभाजी काकडे, भाऊसाहेब ढेबे, शिवाजीराव गावडे, आबासो गावडे, जि.प. सदस्या मंगला गलांडे, प्रियांका ठावरे, पं.स.सदस्य अ‍ॅड. शरद पोळ, माजी सदस्य मोहन येडगे, तेजस्विनी मेटकरी, जयश्री लाडे, नितीन पुकळे, भगवान येडगे, राम झोरे यांच्यासह मान्यवर मंडळींनी मोर्चाचे नेतृत्व केले. 

जोरदार घोषणाबाजी करत व गजी नृत्याच्या ठेक्यावर फेर धरत मोर्चा मुख्य रस्त्याने दत्ता चौकात गेला. दोन अडीच तास मोर्चा सुरू होता. यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलताना प्रविण काकडे म्हणाले, लाचारी सोडून धनगर समाजाच्या नेत्यांनी राजीनामे द्यावेत. धनगर समाजाचा आजपर्यंत राज्यकर्त्यांनी केवळ मतासाठी वापर केले आहे. त्यामुळे या समाजाची अपेक्षित प्रगती झाली नाही. धनगड व धनगर या शब्दाचे खेळ करून समाजाला आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवले. सरकारने तातडीने आंदोलनाची दखल घेतली नाही तर आगामी निवडणुकीत समाजाची ताकद दाखवून देऊ. 

तेजस्विनी मेटकरी हिने आपल्या रोखठोक भाषणात सरकारवर तोफ डागली. गेली सत्तर वर्षे धनगर समाजाला सरकारने झुलवत ठेवले आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे धनगर समाज आरक्षाच्या लाभापासून वंचित राहिला आहे. धनगड शब्द त्यांनी कोठून काढला, या समाजाचे लोक कोण, कोठे आहेत याची माहिती शासनाने जाहीर करावी. निवडणूक आली की समाजाला कुरवाळण्याचे काम केले जाते, मात्र आता माझा समाज बांधव जागृत झाला आहे. धनगर समाजाची तागद सरकाला दाखवून देवू. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला घटनेत आरक्षणाची तरतूद केली मात्र शासनाने धनगर आणि धनगड असा घोळ घालून समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. आरक्षणाची तात्काळ अंमलबावणी करा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, अशा संतप्त भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.