Sat, Apr 20, 2019 08:16होमपेज › Satara › धनगर समाजाचे शेळ्या मेंढ्यासह आंदोलन

धनगर समाजाचे शेळ्या मेंढ्यासह आंदोलन

Published On: Jul 31 2018 1:36AM | Last Updated: Jul 30 2018 10:26PMफलटण : प्रतिनिधी

धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने येथील तहसिलदार कचेरीसमोर   धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सोमवारी दुसर्‍या दिवशी उस्फूर्त प्रतिसादात सुरू असून या आंदोलनात धनगर समाजबांधव शेळी मेंढयांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दरम्यान विविध संघटना व पक्षांनी या बेमुदत आंदोलनास पाठींबा दिला आहे.

सोमवारी सकाळी शिंदेवाडी, तडवळे सस्तेवाडी गावच्या ग्रामस्थांनी तसेच वकील संघटना व मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या पदाधिकारी यांनी युवावर्गासह आंदोलनस्थळी भेट देऊन धनगर समाजाच्या आंदोलनास पाठींबा दिला.   धनगर समाजास आरक्षण मिळेपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. याबाबत सरकारने चालढकल केल्यास धनगर समाजास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यास भाग पडल्यास पुढील घटनेस सर्वस्वी जबाबदारी सरकारवर राहिल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.

फलटण येथे सुरु असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन शांततेत व संयमाने सुरु आहे. तरुणांचे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी आरक्षणाबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी  मागणी  आंदोलनकर्त्यांची असून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न या आंदोलनातून केला जात आहे.

शासनाने धनगर आरक्षणाच्या बाबतीत चालढकल केल्यास किंवा धनगर  समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करुनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्री मंडळातील सदस्य यांना रस्त्यावर फिरु न देण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असेही आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे. 

सकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  व अभिवादन करून दुसर्‍या दिवशीच्या आंदोलनास सुरवात करण्यात आली.  दरम्यान महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीची बैठक बारामतीच्या बांधकाम विश्रामगृहात पार पडली. महाराष्ट्रातून आरक्षण कृती समितीचे अनेक सदस्य या बैठकीस उपस्थित होते. मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा तीव्र करण्याचा निर्णय  या बैठकीत घेण्यात आला. 

या बैठकीत सर्वच सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यापुढील काळात धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचे यामध्ये ठरविण्यात आले. या आंदोलनात एकसूत्रीपणा असावा या उद्देशाने दि 5 ऑगस्ट रोजी पुण्यात महत्वाची बैठक आयोजित करण्याचेही निश्चित करण्यात आले. राज्यभरातील सर्व सामाजिक संघटना, विविध पक्षातील समाजाचे नेते व समाजाचे दोन्ही मंत्री, खासदार, आजी माजी आमदार व कृती समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांची व्यापक बैठक बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या रविवारपासून धनगर समाज आरक्षणाचा निर्णायक लढा सुरु करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.