Mon, Apr 22, 2019 04:15होमपेज › Satara › सातार्‍यात धनगर समाजाचा जनसैलाब (Video)

सातार्‍यात धनगर समाजाचा जनसैलाब(Video)

Published On: Aug 24 2018 2:51PM | Last Updated: Aug 24 2018 6:15PMसातारा : प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला दिलेल्या अनु. जमाती आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने शुक्रवारी दुपारी सैनिक स्कूल मैदानावरून भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. 

यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘जय अहिल्या..जय मल्हार’, ‘आरक्षण आमच्या हक्‍काचं, नाही कुणाच्या बापाचं’, ‘आरक्षण अंमलबजावणी त्वरित करा...नाही तर खुर्च्या खाली करा’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पिवळे वादळ आले होते.

भारतीय राज्यघटनेत धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) असताना धनगर समाजाला या आरक्षणापासून वंचित ठेवले. या आरक्षणाची समाजासाठी त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्हा धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने सातार्‍यात शुक्रवारी विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पारंपरिक वेशभूषेत टाकेवाडी, ता. माण येथून आलेल्या धनगर बांधवांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांनी  गजीनृत्य सादर केले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून समाजबांधव एकत्र जमल्यावर दुपारी दीड वाजता महामोर्चास सुरुवात झाली. मोर्चात धनगर समाजाच्या महिला, मुलाबाळांसह अबालवृद्ध सहभागी झाले होते. यावेळी धनगर समाजबांधव पारंपारिक वेशभूषा परिधान करून ढोलाच्या तालावर गजीनृत्य केले.  भंडार्‍याची मुक्‍त उधळण केली. यावेळी भरपावसात ‘ना नेता ना पक्ष आता धनगर आरक्षण हे एकच लक्ष’, ‘देख लेना आखोंसे आये है लाखोंसे’, ‘सत्तर वर्षे झाला अन्याय घेऊ लढुनी न्याय’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’ यांसह विविध घोषणा देत जिल्हा परिषदमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जूण पिवळे वादळ अवतरले  होते. यावेळी पाच धनगर कन्यांची भाषणे झाली. या भाषणांतून धनगर समाजावर झालेल्या अन्यायाचा लाव्हा फुटला. धनगर कन्यांनी स्पष्ट केले की, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करुन धनगरांना आरक्षण मिळत नसल्यामुळे कित्येक पिढ्या बरबाद झाल्या.  राज्यकर्त्यांनी मराठा तसेच धगनर समाजाला आरक्षणासाठी झुलवत ठेवले. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत अनेकजण मुख्यमंत्री झाले. शरद पवार यांनीही दोन्ही समाजांना आक्षणापासून वंचित ठेवले. या सर्वांना समाजातील मते पाहिजे होती. त्यामुळे समाजबांधवांनी नेत्यांचा स्वार्थीपणा ओळखला पाहिजे. 

चार वर्षांपूर्वी सोलापुरात धनगर समाजाने लाखोंच्या उपस्थितीत काढलेल्या मोर्चात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केला. बारामतीमध्ये झालेल्या धनगर आंदोलनात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सत्‍तेत आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आक्षणावर निर्णय घेवून हे दिलेले आश्‍वासन पाळले नाही. उलटत त्यांनी समाजबांधवांच्या मागे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा (टीस) सेसेमिरा लावला. ही संस्था प्रतिष्ठित, सधन धनगरांचा सर्व्हे आलिशान हॉटेलमध्ये बसून करत आहे. मुळात धनगरांना एसटीचे आरक्षण दिल्याने ‘टीस’चा अहवाल समाजाला मान्यच नाही. फडणवीस सरकारला जसे खुर्चीत बसवता येते तसे खालीही खेचता येवू शकते. भाजप सरकारला 2019 च्या लोकसभा व विधानसभा  निवडणुकीत खांद्यावरील घोंगडे कंबरेला बांधून जागा दाखवून देवू. राज्यात, देशात चार सरकारे येवून गेली. मात्र, त्यांच्यापर्यंत धनगर समाजाचा व्यथा-वेदनांचा हुंकार पोहचेना. आरक्षण देणे बाजूलाच राहिले पण राज्यकत्यांनी ‘धनगर’ आणि ‘धनगड’ची भानगड करुन धनगरांना आरक्षणापासून  वंचित राहिले आहे. त्यामुळे आता लुटुपुटुची लढाई नाही तर आरपारची लढाई होणार, असल्याचा इशाराही दिला.

दरम्यान, धनगर कन्या व समाजबांधवांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये म्हटले आहे, भारतीय राज्य घटनेने धनगर समाजाला दिलेल्या अनु. जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील धनगर समाजास अनुसूचित जमातीचे दाखले वाटप करुन सवलती लागू कराव्यात. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव त्वरित नाव द्यावे, धनगर आरक्षणावेळी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. समांतर आरक्षणाचे दि.13 ऑगस्ट 2014 रोजी काढलेले परिपत्रक सुधारावे, यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली 20 पोलिस अधिकारी, 100 कर्मचार्‍यांसह राखीव दलाचे पोलिस अनुचित प्रकार घडू नये यासाठी तैनात करण्यात आले होते.

कराडला पुन्हा 28 रोजी मोर्चा

महाराष्ट्र धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शुक्रवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा यशस्वी झाल्याने मंगळवारी (दि. 28) कराड येथे धनगर समाजाचा विराट मोर्चा निघणार असून, त्यास जिल्ह्यातील धनगर समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

माणुसकीचे दर्शन

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर काही वेळात धनगर समाजातील कन्यांची भाषणे चालू होती. यावेळी पोवईनाक्याकडून रुग्णवाहिका आली. यावेळी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता धनगर समाज बांधवांनी त्या रुग्णवाहिकेला जाण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे यातून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. पाऊस सुरू असताना मोर्चा जराही हलला नाही.