Mon, Jun 17, 2019 14:39होमपेज › Satara › उपसभापती पदासाठी देवराज पाटील यांना संधी?

उपसभापती पदासाठी देवराज पाटील यांना संधी?

Published On: Jun 21 2018 1:20AM | Last Updated: Jun 20 2018 11:40PMकराड : प्रतिनिधी  

कराड पंचायत समितीच्या सभापती सौ. शालन माळी व उपसभापती रमेश देशमुख यांचे राजीनामे मंजूर झाले असून नुतन पदाधिकारी निवडीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. सभापती पद उंडाळकर गटाला मिळणार असून या गटाकडे ओबीसी महिला प्रवर्गातील सदस्य एकमेव फरिदा इनामदार असल्याने त्यांचे नाव जवळ जवळ निश्‍चित झाले आहे. उपसभापती पदासाठी देवराज पाटील यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आ.बाळासाहेब पाटील यांच्या निकटवर्तीयांनी याला दुजोरा दिला आहे.  चोवीस सदस्य संख्या असणार्‍या पंचायत समिती सभागृहात आ. बाळासाहेब पाटील गटाचे सात सदस्य आहेत. यामध्ये सभापती सौ.शालन माळी यांच्यासह देवराज पाटील, रमेश चव्हाण, सुहास बोराटे, प्रणव ताटे, वणिता माने, सुषमा नागे यांचा समावेश आहे. उंडाळकर गटाचेही सात सदस्य आहेत. यामध्ये उपसभापती रमेश देशमुख, सविता संकपाळ, सुरेखा पाटील, फरीदा इनामदार, काशिनाथ कारंडे, शरद पोळ, मनिषा पाटील यांचा समावेश आहे. 

निवडणुकीत कोणत्याच गटाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने  आ. बाळासाहेब पाटील व उंडाळकर गटाने आघाडी कडून सत्ता स्थापन केली आहे. या दोन्ही गटांची सदस्य संख्या समान म्हणजे प्रत्येकी सात असल्याने सभापती पद दोन्ही गटाने सव्वा सव्वा वर्षासाठी वाटून घेतले होते. विद्यमान सभापती, उपसभापतींचा सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामे दिले आहेत. नुतन पदाधिकारी  निवडीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. सभापती पदासाठी फरीदा इनामदार यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे. उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये देवराज पाटील, सुहास बोराटे, रमेश चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.यामध्ये देवराज पाटील यांना आ. पाटील संधी देतील अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे. देवराज पाटील यांनी स्वतः ती नाकारल्यास सुहास बोराटे यांना लॉट्री लागू शकते. 

पुढील वर्षी येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देवराज पाटील यांच्यावर आ. बाळासाहेब पाटील जबाबदारी सोपवतील अशीच शक्यता अधिक वर्तवली जात आहे.