Tue, Jul 16, 2019 13:44होमपेज › Satara › कण्हेर धरणाजवळ युगुलाला लुटणारी टोळी गजाआड

कण्हेर धरणाजवळ युगुलाला लुटणारी टोळी गजाआड

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 11:36PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

कण्हेर धरणाजवळ प्रेमीयुगुलांना चाकूचा धाक दाखवून लुटणार्‍या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पर्दाफाश करून दोघांना गजाआड केले. दोन्ही संशयित माण तालुक्यातील असून जिल्ह्यात पर्यटनासाठी येणार्‍यांचीही त्यांनी लूटमार केल्याची शक्यता आहे. दीपक नामदेव मसुगडे (वय 21, रा.नवलेवाडी) व समाधान ऊर्फ सम्राट दिलीप खरात (21, रा.मलवडी, ता. माण) अशी लूटमारप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील दीपक मसुगडे हा सराईत गुन्हेगार असून अन्य संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. 

पोलिसांनी कारवाईबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. सातारा तालुक्यातील कण्हेर धरण परिसरात 29 ऑक्टोबर रोजी पाच जणांच्या टोळीने तक्रारदार व त्यांच्या मित्रांना चाकूचा धाक दाखवून रोख 25 हजार रुपये, मोबाईल व सोन्याची चेन असा लाखो रुपयांचा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला होता. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत होते मात्र त्यात यश आले नव्हते. एलसीबीचे पथकही दरोड्याच्या गुन्ह्याचा शोध घेत असताना त्यांना संशयित आरोपींची माहिती मिळाली. संशयितांपैकी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कण्हेर येथील दरोड्याची कबुली दिली. 

दरम्यान, केसरकर पेठेतील आशा खैरमोडे या वृध्द महिलेचा चार महिन्यांपूर्वी खून झाल्यानंतर एलसीबी व शहर पोलिसांचा संयुक्‍त तपास सुरु होता. त्या खुनाचाही छडा लावून संशयित प्रशांत गाडे व भरत भोसले या दोघांना अटक करण्यात यश मिळाल्याची माहितीही पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक डॉ.खंडेराव धरणे, पोनि पद्माकर घनवट, पोनि नारायण सारंगकर, पोनि प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास जाधव, फौजदार प्रसन्‍न जर्‍हाड आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

प्रेमीयुगुल, कुटुंबीय, पर्यटकांनी तक्रार द्यावी...

एलसीबीने अटक केलेल्या संशयितांकडे कसून चौकशी सुरू असून त्यांनी आणखी लूटमार केल्याची शक्यता आहे. कण्हेर, कास पठार, लिंबखिंड परिसर याठिकाणी लूटमार, दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी तक्रार दिल्यास त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील. यामुळे ज्या प्रेमीयुगुल, कुटुंबीयांची लूटमार झाली आहे, त्यांनी निडरपणे समोर येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.