Tue, Apr 23, 2019 05:40होमपेज › Satara › उपनगराध्यक्ष राजू भोसलेंचा राजीनामा

उपनगराध्यक्ष राजू भोसलेंचा राजीनामा

Published On: Jan 19 2018 1:58AM | Last Updated: Jan 18 2018 10:44PMसातारा : प्रतिनिधी

सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्ष राजू भोसले यांनी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्याकडे राजीनामा दिला. नगराध्यक्षांच्या दालनात गुरुवारी दुपारी  अचानक या घडामोडी घडल्या.  त्यामुळे पालिकेत लवकरच उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक निवडी होणार आहेत. साविआ पदाधिकार्‍यांच्या बैठकीत या निवडीसंदर्भात शुक्रवारी चर्चा होणार आहे.

सातारा नगरपालिकेत श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीसेवा पुरस्कार वितरण सोहळा पार पडल्यानंतर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी नगराध्यक्षांच्या दालनात पदाधिकार्‍यांची चर्चा केली. त्याचवेळी उपनगराध्यक्ष राजू  भोसले यांनी पदाचा राजीनामा नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्याकडे सुपूर्द केला असून नगराध्यक्षांनीही हा राजीनामा  मंजूर केला. सभापतीनिवडीनंतर उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक निवडीसंदर्भात चर्चा सुरु होती. दि. 15 रोजीनंतर या निवडी पार पडतील असा अंदाज होता.

त्यानुसार राजीनामा नाट्य घडले. उपनगराध्यक्षांबरोबरच आता साविआकडून स्वीकृत नगरसेवकही बदलले जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर आघाडीतील पदाधिकार्‍यांमध्ये शुक्रवारी चर्चा होणार आहे. साविआमध्ये उपनगराध्यक्षपदासाठी बरेचजण इच्छुक आहेत. त्यामध्ये सुहास राजेशिर्के यांचे नाव आघाडीवर आहे. स्वीकृत नगरसेवक बदलाच्याही हालचाली सुरु आहेत.  नगर पालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या 4 जागा आहेत. त्यापैकी साविआ 2, नगर विकास आघाडी व भारतीय जनता पक्षाचे प्रत्येकी 1 असे 4 स्वीकृत नगरसेवक आहेत.

साविआकडून दोनपैकी एकच स्वीकृत नगरसेवक बदलला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, संबंधिताकडून आपल्याला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होत असल्याचे सूत्रांकडून समजते. आघाडतील काही ज्येष्ठांकडूनही ‘स्वीकृत’साठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. नविआ आणि भाजपकडून याबाबतीत तूर्त हालचाली नाहीत. मात्र, साविआने बदल केल्यानंतर नविआ व भाजपकडूनही खांदेपालट केली जाण्याची शक्यता आहे.

पदाधिकारी  निवडीसंदर्भात सर्व निर्णय आघाडीचे नेते खा.  उदयनराजे घेणार आहेत. त्यांच्याकडून पदाधिकार्‍यांची नावे निश्‍चित केली जाणार असल्याने कुणाची वर्णी लागणार याबाबत नगरसेवकांसह सातारकरांमध्ये उत्सुकता ताणली आहे.  पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम नगराध्यक्षा जाहीर करणार आहेत. सर्व नगरसेवकांना नोटीस काढून त्यांच्याच अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलावली जाणार आहे.  दोन दिवसांत  ही प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.

साविआत उपनगराध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक

मागील वर्षात अपेक्षित कामे करता न आल्याची बर्‍याच जणांची खंत  असून, अशी परिस्थिती कार्यकाल संपण्यापूर्वी येण्याची शक्यता गृहीत धरून साविआतील बरेच जण पद लवकर मिळावे, यासाठी इच्छुक आहेत. नगरपालिकेतील पदांवर प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळेल, असे आश्‍वासन आघाडीचे नेते  खा. उदयनराजे भोसले यांनी नगरसेवकांना दिले आहे. तरीही उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवकपदांसाठी अनेकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.