Thu, Jul 18, 2019 04:07होमपेज › Satara › अडलंय लगीन ‘कोंढाण्या’चं अन् ‘रायबा’चं बी

अडलंय लगीन ‘कोंढाण्या’चं अन् ‘रायबा’चं बी

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:08PMसातारा : सुशांत पाटील

अधिकारी होण्यासाठीच्या जिद्दीनं पेटून उठलेले एमपीएससी करणारे छात्र शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे द्विधा अवस्थेत सापडले आहेत. युपीएससीसारखी नियोजनबध्दता एमपीएसीत अजूनही दिसून येत नाही. त्यात  उमेदीचं वय निघून चालल्यामुळे विद्यार्थ्यांसमोरील चिंता वाढत असून एमपीएससीच्या चिंताजनक धोरणामुळे नोकरीबरोबर लग्नाचाही गंभीर प्रश्‍न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.

एमपीएससी विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास हा खरोखरच वाखाणण्याजोगा असतो. आयोगाच्या जाहिरातीची वाट पाहणं, जाहिरात आली की परीक्षेची तयारी करणं नंतर निकालाची वाट पाहणं  अन् नापास  झालं  तरी पुन्हा जिद्दीनं उभं राहून एमपीएससी अन् युपीएससीच्या लग्नाची  तयारी करणं, असा दिनक्रम या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांचा दिसून येतो. 

अलिकडे सातार्‍यात पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांचा अधिक कल हा स्पर्धा परीक्षांकडे असल्याचे दिसून येत आहे. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील मुलंदेखील स्पर्धा परीक्षांच्या तयारीत स्वत:ला झोकून देत असल्याचे चित्र दिसत आहे. ही मुलं अधिकारी होऊन समाजात बदल घडावा, या उमेदीने पेटून उठत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी   स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिकेत सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत अत्यंत तळमळीने अभ्यास करताना दिसतात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना ह्या मुलांमध्ये इतका आत्मविश्‍वास  भरलेला असतो की, आपण अधिकारी होऊच पण नाही झालो तरी एक चांगला माणूस निश्‍चीतपणे होऊ. 

सध्या एमपीएससीच्या विविध पदांच्या जाहिराती  वेळेवर येत नाहीत, परीक्षांचा निकाल वेळेवर  लागत नाही, त्यात शासनाने आणलेली नोकरभरती तसेच  कपातीमुळे विद्यार्थ्यांचे उमेदीचे वय निघून चालले आहे. युपीएससी परीक्षेसारखं योग्य वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला अजूनही करता येत नाही. नोकर्‍यांच्या अभावामुळे अनेकजण आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. मात्र, सरकारच्या उदासिन भुमिकेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आता आंदोलन करण्याची वेळ येऊ लागली आहे. काही शहरातून तशी आंदोलनेही झाली आहेत. तरी देखील सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कळवळा दिसून येत नाही.

या सर्वांचा परिणाम  विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होऊ लागला आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा युवा वर्ग अधिक आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही.