होमपेज › Satara › डेंग्यूचे पुन्हा 3 रुग्ण आढळले

डेंग्यूचे पुन्हा 3 रुग्ण आढळले

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:51PMसातारा : प्रतिनिधी

सातारा नगरपालिकेकडून यावर्षी धूर फवारणी (फॉगिंग) झाली नसल्याच्या काही नगरसेवकांच्याच तक्रारी आहेत. फॉगिंग न केल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादूर्भाव झाला असून सातार्‍यात डेंग्यूचे रुग्ण वाढत चालले आहेत. सोमवार पेठ, भवानी पेठेत पुन्हा तीन  डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या गचाळ कारभारामुळे सातारकरांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

सातारा शहरातील डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी शनिवार पेठेतील दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  प्रमोद कदम तसेच विकी धारके हे दोघे जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दोघेही खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने शासकीय यंत्रणांना माहिती नसावी. पण,  डेंग्यूच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांत उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.  भवानी पेठेतील सिद्धान्त सुरेश सारडा याच्यावर समर्थ हॉस्पिटलमध्ये गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्याच्या आई-वडिलांवरही काही दिवसांपूर्वी उपचार सुरु होते, अशी माहिती मिळत आहे. सोमवार पेठेतील जावेद बागवान याच्यावरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याशिवाय याच भागातील नृसिंह मंडळ परिसरातील एकजण डेंग्यूवर उपचार घेत असल्याचेही समोर आले आहे.  सातारा शहरात डेंग्युचे एकूण पाच रुग्ण असल्याचे समोर आले आहे. 

डेंग्युचे रुग्ण असलेला परिसर पाहिला तर तो मध्यवस्तीतील आहे. शहरातील नागरिकांची अशी अवस्था असेल तर बाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये काय परिस्थिती असेल याची कल्पना करा, अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्‍त करत आहेत.

दरम्यान, सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळा सुरु होण्याच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी पेठापेठांमध्ये धूरफवारणी केले जाते. शहरातील लक्ष्मीबाई झोपडपट्टी, भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, केसरकर पेठ, शनिवार पेठ, कामाठीपुरा या परिसरातील झोपडपट्ट्यांतही स्वच्छतेच्यादृष्टीने उपाययोजना करुन डासांची पैदास होणार नाही, याची काळजी घेतली जाते. त्यासाठी गल्‍लीबोळातही फॉगिंग केले जाते. यावर्षी मात्र, अशा उपाययोजना केल्या गेल्या नसल्याच्या तक्रारी काही प्रभागांचे नगरसेवकच करत आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना सांगूनही धूरफवारणी केली जात नसल्याने नगरसेवक संतप्‍त आहेत. शनिवार, सोमवार, भवानी पेठ परिसरात डेंग्यूची साथ आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने मोठ्या फॉगिंगची मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे. शनिवार पेठेत डेंग्युचे रुग्ण आढळल्यावर वरिष्ठ भाग निरीक्षक राजेंद्र कायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाग निरीक्षक दत्‍ता रणदिवे, पी. ए. यादव, गणेश टोपे यांनी कर्मचार्‍यांकरवी त्या परिसरात फॉगिंग केले. मात्र, शहराच्या उर्वरित भागातही फॉगिंग करावे, अशी मागणी होत आहे.