Mon, Jul 13, 2020 23:17होमपेज › Satara › सापडलेला मोबाईल देण्यासाठी शरीर सुखाची मागणी

सापडलेला मोबाईल देण्यासाठी शरीर सुखाची मागणी

Published On: Jun 13 2019 1:36AM | Last Updated: Jun 13 2019 1:36AM
सातारा : प्रतिनिधी

पतीचा मोबाईल व पैशाचे पाकीट हरवल्यानंतर पत्नीने पतीच्या मोबाईलवर फोन लावल्यानंतर ज्याला हे सापडले होते त्याने ‘तुला जर तुझ्या नवर्‍याचा मोबाईल व पाकीट पाहिजे असेल तर शरीरसंबंध ठेव,’ अशी धक्‍कादायक मागणी करून विनयभंग केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

याप्रकरणी सातारा शहर परिसरातील 41 वर्षीय महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 9 रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिलेच्या पतीचा मोबाईल, पैशाचे पाकीट, कागदपत्रे गहाळ झाले होते. पती घरी आल्यानंतर त्यांनी पत्नीला स्वत:च्या मोबाईलवर फोन करण्यास सांगितले. फोन लावल्यानंतर तो लागला व समोरुन अनोळखी व्यक्‍ती बोलत होती. संशयिताला मोबाईल मागितल्यानंतर त्याने अश्‍लिल संवाद साधण्यास सुरुवात केली.

संशयिताने तक्रारदार महिलेला उद्देशून ‘तुला जर तुझ्या नवर्‍याचे हरवलेले कागदपत्र, पैशाचे पाकीट, मोबाईल पाहिजे असेल तर आऊट साईडला ये, मी तुझ्या नवर्‍यासारखाच आहे. माझ्याशी तू शरीरसंबंध ठेव,’ असे म्हणत तक्रारदार महिलेचा विनयभंग केला. घडलेल्या घटनेनंतर महिलेने शहर पोलिस ठाण्यात जावून घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.