Fri, Apr 26, 2019 15:21होमपेज › Satara › ‘महिला बालकल्याण’ अधिकार्‍यांची खाबूगिरी

‘महिला बालकल्याण’ अधिकार्‍यांची खाबूगिरी

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:13PMसातारा : प्रवीण शिंगटे

सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी गेल्या 2 ते 3 वर्षांपासून दर महिन्याला काहीतरी कारण सांगून वारंवार पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात होवू लागल्या आहेत. याबाबत दैनिक ‘पुढारी’कडेही तक्रारी आल्या असून संंबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी महिला पर्यवेक्षिकांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील जबाबदार अधिकारी दर महिन्याला काहीतरी कारण सांगून वर्गणी गोळा करतात. कधी ऑडिट सुरू झाले आहे तर कधी मुंबईची कमिटी आली आहे, कधी आयुक्त तपासणी तर कधी मुंबईला पैसे द्यावयाचे आहेत, तर कधी साहेबांचा सेंड ऑफ आहे अशी विविध कारणे सांगून दर महिन्याला पैसे गोळा करण्याचे काम येथील अधिकारी करत असल्याच्या तक्रारी एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. दर महिन्याला जिल्हा कार्यालयाला वर्गण्या किती द्यावयाच्या असा  प्रश्‍न पडला असल्याचे  महिला पर्यवेक्षिकांचे म्हणणे आहे. एखाद्या वेळेस पैसे दिले नाही तर फोनवरून वारंवार पैसे मागत असतात. तसेच डायरीमधील सर्व प्रकल्पाचे पैसे आल्याची नोंद दाखवून तुमचेच पैसे राहिले आहेत.साहेब खूप चिडलेत, पैसे लवकर द्या, असे फर्मावले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.  

गतवर्षी ऑफीस खर्चासाठी प्रत्येक प्रकल्पाला 50 हजार रुपये दिले होते. त्यापैकी 5 हजार रुपयांची खोटी बिले टाकून संबंधित महाशयाने 5 हजार रुपये परत देण्यास सांगितले.सातारा जिल्ह्यातील 18 प्रकल्पांचे प्रत्येकी 5 हजार रुपये असे मिळून 90  हजार रुपये संबंधित अधिकार्‍यांकडे जमा केले असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

वर्षाला फोन बिल 12 हजार रुपये, लाईट बिल 12 हजार रुपये, नेटसाठी 6 हजार रुपये, संगणक व प्रिंटरसाठी 10 हजार रुपये, संबंधित अधिकार्‍यांसाठी 5 हजार रुपये असे मिळून 45 हजार रुपये खर्च झाले आहेत. राहिलेल्या 5 हजार रुपयांमध्ये वर्षे कसे चालवायचे, खिशातले पैसे किती दिवस घालायचे, आणि किती दिवस संबंधित अधिकार्‍याला पैसे देवून पोसायचे? असा प्रश्‍न महिला पर्यवेक्षिकांनी उपस्थित केला आहे.जिल्ह्यातील सर्वच पर्यवेक्षिका संबंधित अधिकार्‍यांच्या भितीखाली वावरत आहेत. पैसे दिले नाहीत तर तुमचा सीडीपीओचा कार्यभार काढून घेतो आणि डीई चालू करतो अशी धमकी संबंधीत महाशय देत असल्याच्या तक्रारी महिला पर्यवेक्षिकांनी केली आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेवून संबंधित अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी करून त्याला तात्काळ निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी पर्यवेक्षिकांनी केली आहे.

कोर्‍या पावत्या कशासाठी घेतल्यात.....

नायगाव खंडाळा येथे नुकत्याच झालेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या कार्यक्रमासाठी सर्व प्रकल्पाकडून वर्गणी घेण्यात आली तसेच कोर्‍या पावत्याही मागून घेण्यात आल्या.तसेच एवढे करूनही वारंवार संबंधित अधिकार्‍यांकडून त्रास दिला जातो. संबंधित अधिकार्‍यांकडे सीडीपीओचा कार्यभार आहे. कोणत्याही पर्यवेक्षिकांना याबाबत विचारल्यास संबंधित अधिकार्‍यांचे आर्थिक कारनामे समोर येतील, असा दावाही काही महिला पर्यवेक्षिकांनी निवेदनाद्वारे केला आहे.