Thu, Sep 19, 2019 03:26होमपेज › Satara › मे. डेल्टा न्यूट्रिटिवसह दोघांना दोन लाखांचा दंड

मे. डेल्टा न्यूट्रिटिवसह दोघांना दोन लाखांचा दंड

Published On: Jun 13 2019 1:36AM | Last Updated: Jun 13 2019 1:36AM
सातारा : प्रतिनिधी 

वाई एमआयडीसीतील मे. डेल्टा न्यूट्रिटिव प्रा. लि. या  कंपनीतील उत्पादित होत असलेल्या ‘डेकोरेटिव ग्लेज प्रोप्रायर्टी फूड’ या अन्‍नपदार्थाची तपासणी अन्‍न औषध प्रशासनाने केली असता त्याच्या लेबलवर  स्टेबिलायजर म्हणून आगार या फूड अ‍ॅडिटिव्जचा उल्‍लेख केलेला असताना त्याऐवजी स्टार्च या अन्‍नपदार्थाचा वापर करत असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी पुणे विभागाच्या न्यायनिर्णय अधिकार्‍यांनी महादेव गायकवाड व अविनाशकुमार दुबे-नॉमिनी मे. डेल्टा न्यूट्रिटिव प्रा. लि.  यांना संयुक्‍तपणे 2 लाखांचा दंड ठोठावला.

पुणे सहआयुक्‍त (अन्‍न) सुरेश देशमुख तसेच सहायक आयुक्‍त (अन्‍न) शिवकुमार कोडगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्‍न सुरक्षा अधिकारी अनिल पवार यांनी 13 डिसेंबर 2018 रोजी ही कारवाई केली होती. अन्‍न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत अन्‍नपदार्थ उत्पादन करत असताना अन्न पदार्थ किंवा फूड अ‍ॅडिटीव्ह वापरले जातात. त्याबाबत लेबलवर उल्‍लेख करणे आवश्यक असतानाही संबंधित अन्न पदार्थाच्या लेबलवर स्टार्च ऐवजी आगारचा उल्‍लेख केलेला आढळून आल्यामुळे डेक्योरेटीव ग्लेज प्रोप्रायर्टी फूड व स्टार्च प्रोडक्टस यांचे नमुने घेवून 2 लाख 77 हजार 850 रुपयांचा 1 हजार 927 किलो साठा जप्‍त केला होता.  या अन्न पदार्थांचा विश्‍लेषण अहवाल प्राप्‍त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे पॅकेजिंग व लेबलिंग नियमावलीचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी राजकुमार महादेव गायकवाड, अविनाशकुमार दुबे-नॉमिनी मे. डेल्टा न्युट्रिटीव प्रा. लि. यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाईसाठी न्यायनिर्णयाकरता पुणे न्यायकक्षेत दाखल केले होते. दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर या प्रकरणी पॅकेजिंग व लेबलिंग नियमावलीचे उल्‍लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायनिर्णय अधिकारी एस. ए. देशमुख यांनी राजकुमार गायकवाड, अविनाशकुमार दुबे-नॉमिनी मे. डेल्टा न्युट्रीटीव प्रा. लि.  यांना संयुक्‍तपणे 2 लाखांचा दंड ठोठावला. 

सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन शिवकुमार कोडगिरे यांनी केले आहे.