Sat, Jul 20, 2019 23:34होमपेज › Satara › कोयना प्रकल्प खुला करणे सार्वत्रिक हिताचे : मोडक

कोयना प्रकल्प खुला करणे सार्वत्रिक हिताचे : मोडक

Published On: Jan 16 2018 2:17AM | Last Updated: Jan 15 2018 10:33PM

बुकमार्क करा
पाटण : गणेशचंद्र पिसाळ

अमेरिकेसारख्या प्रगत देशातही पर्यटन विकास होण्यासाठी धरणे व वीजनिर्मिती प्रकल्पांचा वापर केला जातो. कोयना प्रकल्पाबाबत सुरक्षेचा बागुलबुवा न करता आवश्यक ती खबरदारी घेऊन हे प्रकल्प पर्यटकांसाठी खुले करावेत, असे मत कोयना प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी दै. ‘पुढारी’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्‍त केले. 

कोयना धरण व जलविद्युत प्रकल्प याबाबत सकारात्मक उपाययोजना सुचविताना दीपक मोडक म्हणाले, या प्रकल्पांनी निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला वीज व पाणी दिले. शिवाय, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांतील महत्त्वपूर्ण सिंचनाची गरज भागवली. त्यामुळे या प्रकल्पाला सर्वच पातळ्यांवर अनन्यसाधारण महत्त्व  प्राप्त झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पांना बंदी घालणे अजिबात योग्य नाही. याउलट याच ठिकाणांना प्रोत्साहन देताना येथे आणखी नवीन काय निर्माण करता येईल, याचा विचार होणे आवश्यक आहे. 

धरण, वीजनिर्मिती प्रकल्प पाहण्यासाठी येणार्‍यांसाठी फोटोसह देण्यात येणार्‍या पासेसवर जलसंपदा व सुरक्षा यंत्रनांचा संयुक्‍त परवाना देण्यात यावा. यासाठी खासगी वाहने काही ठराविक अंतरावरच ठेवून तेथून शासकीय किंवा शासनानेच भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनांतून पर्यटकांना फिरवावे. कोयना धरण, शिवसागर जलाशय व वीजनिर्मिती प्रकल्प येथे फिरताना त्याचे वेगवेगळे प्रवेश शुल्क आकारण्यात यावेत. संबंधित वाहनांमध्ये सीसीटीव्ही आदी आधुनिक यंत्रणा बसवाव्यात आदी उपाययोजना कराव्यात.

वास्तविक आज जगभर धरणे, वीजनिर्मिती प्रकल्प हे पर्यटनाचे मुख्य माध्यम ठरत आहेत. अगदी अमेरिकेत हुव्हर या जगविख्यात धरणात प्रवाशांना प्रवेश दिला जातो. कमी शुल्कात धरण माथ्यावर, ज्यादा शुल्क घेऊन धरण गॅलरी व वीजगृहात नेले जाते व धरण पायथ्याच्या जलाशयात बोटीने फिरविले जाते. यातूनच जगाला प्रगत तंत्रज्ञानाची ओळख होते आणि सरकारलाही चांगला महसूल मिळाल्याने अशा प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती सोपी होते. 

स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत या तिन्ही अभियांत्रिकी शाखांचा मेळ घालून हे प्रकल्पसंकुल आकाराला आले आहेत. त्यामुळे या सर्व शाखांच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना या कोयना प्रकल्पाची भेट त्यांच्या ज्ञानात भर घालणारी ठरेल. 

एकुणच काळाची गरज म्हणून कोयना प्रकल्प पाहाण्यासाठी बंदी तात्काळ उठवून तेथे प्रोत्साहनपर नवनवे बदल केले तर येथे पर्यटन अधिक गतीने वाढेल आणि भागाचा विकास झपाट्याने होवून पुन्हा कोयनेला गतवैभव प्राप्त होईल. मात्र यासाठी स्थानिकांसह लोकप्रतिनिधी प्रशासन व शासनाने सकारात्मक पावले उचलण्याची नितांत गरज असल्याचेही दीपक मोडक यांनी स्पष्ट केले.