Fri, May 29, 2020 18:05होमपेज › Satara › सातारा जिल्ह्यातील ६० विहिरींच्या पाणी पातळीत घट

सातारा जिल्ह्यातील ६० विहिरींच्या पाणी पातळीत घट

Published On: Apr 13 2019 1:51AM | Last Updated: Apr 12 2019 10:57PM
सातारा : प्रविण शिंगटे

जिल्ह्यातील 106 विहिरींचे भूजल सर्वेक्षण विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये 60 विहिरींच्या पाणीपातळीत घट निर्माण झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. माण तालुक्यातील विहिरींची भूजल पातळी 2.26  तर फलटण तालुक्यातील 1.36 मीटरने घटली आहे. सर्वेक्षणामध्ये ही गंभीर बाब समोर आली असून यासाठी आता पाणी बचाव मोहिम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

भूजल सर्वेक्षण विभागामार्फत दरवर्षी जानेवारी व सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात भूजल पातळीची पाहणी केली जाते. त्यानुसार जिल्ह्यातील सातारा कराड, पाटण, महाबळेश्‍वर, वाई, खंडाळा, फलटण, कोरेगाव, खटाव, माण व जावली तालुक्यातील विहिरींचा सर्व्हे करण्यात आला. जावली तालुक्यातील एका विहिरीची 0.22 पाणी पातळी वाढली आहेे. कराड तालुक्यातील 15 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले, त्यामध्ये आठ विहिरींच्या भूजल पातळीत घट झाली आहे. खंडाळा तालुक्यातील पाच विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. दोन विहिरींची 1.13 मीटरने भूजल पातळीत घट झाली आहे. खटाव तालुक्यातील 17 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये दहा विहिरींची 0.89  मीटरने भूजल पातळीत घट झाली आहे. कोरेगाव तालुक्यातील 9 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले, त्यापैकी 4 विहिरींच्या पाणी पातळीत घट झाली आहे. माण तालुक्यात 16 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले, पैकी 14 विहिरींमधील भूजल पातळी 2.26 मीटरने घटली आहे. महाबळेश्‍वर तालुक्यातील तीन विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यापैकी सर्व विहिरींची पाणी पातळी 0.77 मीटरने घटली आहे.

पाटण तालुक्यातील 10 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये चार विहिरींची भूजल पातळी खालावली आहे. फलटण तालुक्यातील 12 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले त्यामध्ये 10 विहिरींची पाणीपातळी 1.36 मीटरने घटली आहे. सातारा तालुक्यातील दहा विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये तीन विहिरींच्या भूजल पातळीत घट झाली आहे. वाई तालुक्यातील 8 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये 2 विहिरींच्या पाणीपातळीत घट निर्माण झाली आहे.

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढली आहे, त्यामुळे जनजीवन होरपळून गेले आहे. माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटल्याने मे महिन्यात आणखी भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भूजल पातळीत  घट होत असल्याने काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत.