Thu, Jul 18, 2019 16:34होमपेज › Satara › ग्रामविकास विभागाचे आदेश : बँका व पतसंस्थांपुढे अडचणी

नमुना ८ वरून कर्जाचा बोजा हद्दपार

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 11:12PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

ग्रामपंचायत नमुना नं.8 हा अधिकार अभिलेख नसून, फक्त कर आकारणी नोंदवही असल्यामुळे त्यावर सहकारी संस्थांचे भार व कर्ज बोजा नोंदवता येणार नसल्याचे कायद्यात नमूद आहे.  त्यामुळे यापुढे नमुना नं 8 वर कर्जाचा बोजा नोंदवता येणार नसल्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर बँका व सहकारी संस्थांना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा व तालुका स्तरावर भूमी अभिलेख कार्यालयाकडून तयार करण्यात येणार्‍या प्रॉपटी कार्डवर कर्ज बोजासंबधीच्या नोंदी घेता येऊ शकणार आहेत.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम तरतुदीनुसार, ग्रामपंचायतीच्या नमुना नं.8 मधील मिळकतीवर कर्जाचा बोजा अगर इतर कोणताही बोजा नोंदवण्याची तरतूद नाही. जिल्हा व तालुका स्तरावरील भुमी अभिलेख कार्यालयाकडून तयार करण्यात येणारे प्रॉपटी कार्ड हे गावातील घराबाबतच्या मालकी हक्काबाबतचा अधिकार अभिलेख असतो. मात्र, नमुना नं. 8 मध्ये आता कर्जाची नोंद करता येणार नाही. याबाबतचे पत्र काढून सर्व जिल्हा परिषदांना याची अंमलबजावणी करण्याचे आदेेश देण्यात आले आहेत. शासनाच्या या आदेशामुळे नागरिकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

बहुतांश नमुना नं 8 च्या उतार्‍यावर कर्ता पुरूष व कुटूंब प्रमुख या नात्याने पुरूषाचे नाव असायचे त्यामुळे कुटूंबातील इतर सदस्यांना विश्‍वासात न घेताही त्यांना कर्ज काढता येत होते. या कर्जाचे हफ्ते थकल्यानंतर बँका किंवा पतसंस्था वसुलीचा तगादा लावल्यानंतरच घरच्यांना त्याची माहिती पडत होती. काही पतसंस्था व बँका फक्त 8 अ च्या उतार्‍यावर कर्जाचा बोजा चढवत होते. या प्रकाराला आता आळा बसणार आहे. ग्रामविकास विभागाच्या या फतव्यामुळे एकप्रकारे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी सहकारी संस्थांना हा निर्णय आता अडचणीचा ठरणार आहे.