होमपेज › Satara › गॅस्ट्रोसद‍ृश साथीने दोघांचा मृत्यू

गॅस्ट्रोसद‍ृश साथीने दोघांचा मृत्यू

Published On: May 16 2018 1:37AM | Last Updated: May 16 2018 1:37AMकोरेगाव : प्रतिनिधी 

साप, ता. कोरेगाव येथे गॅस्ट्रोसद‍ृश साथीचा फैलाव झाला असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 50 पेक्षा अधिक नागरिकांना या साथीची लागण झाली असून गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दूषित पाण्यामुळे ही साथ पसरल्याचे सांगण्यात येत असून आरोग्य यंत्रणा साथ नियंत्रणासाठी अ‍ॅलर्ट झाली आहे.

किशोर सुरेश दाभाडे (वय 28) व मारुती रावंदाल बुधावले (वय 67) अशी साथीने बळी पडलेल्या रुग्णांची नावे आहेत. सापमधील वॉर्ड क्र. 1 व 2 सह राजवाडा परिसरात गटारांतून वितरित होणार्‍या पाईपलाईनच्या लीकेजमधून दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे गॅस्ट्रोसद‍ृश साथीने  थैमान घातले. या परिसरातील बहुसंख्य नागरिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. किशोर दाभाडे व बुधावले वस्ती येथील मारुती बुधावले यांना सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला, तर गावातील बहुसंख्य रुग्ण रहिमतपूर येथील तीन खाजगी हॉस्पिटलसह, जि.प. प्राथमिक आरोग्य केंद्र रहिमतपूर येथे उपचारासाठी अ‍ॅडमिट झालेले आहेत. 

गॅस्ट्रोसदृश्य साथीची माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ जाधव, वैद्यकीय अधिकारी संदिप पाटील यांनी सर्व स्टाफसह ग्रामपंचायतीमध्ये रुग्ण विभाग तयार करत जागीच उपचाराची सुविधा उपलब्ध केली. यावेळी साधारणत: 50 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. तसेच घर टू घर सर्व्हे करण्यात आला.

घटनास्थळी जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. कैलास शिंदे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान पवार, अतिरिक्त जिल्हा अधिकारी विनित फाळके, बीडीओ मगर, सहाय्यक बीडीओ ए.ए. सय्यद  यांनी भेटी दिल्या. 

तालुका वैद्यकीय अधिकारी राजाभाऊ जाधव यांनी पाणी व टीसीएलचे नमुने घेतलेले असून ते शासकीय प्रयोग शाळेत पाठविले आहेत. तसेच नागरिकांनी घाबरुन न जाता गावातच उपलब्ध केलेल्या आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.